रंकाळ्यातील दूषित पाणी बाहेर काढणार
By Admin | Updated: July 9, 2014 01:05 IST2014-07-09T00:45:00+5:302014-07-09T01:05:11+5:30
महापौरांनी केली पाहणी : सांडव्याजवळ चर

रंकाळ्यातील दूषित पाणी बाहेर काढणार
कोल्हापूर : रंकाळ्याचा हिरवट रंग व दुर्गंधीयुक्त पाणी सांडव्याजवळ आठ फूट खोलीची चर मारून दुधाळी नाल्यात सोडले जाणार आहे. ड्रेनेज लाईन ‘चोकअप’ व चर मारण्याचा कामाचा आज, मंगळवारी महापौर सुनीता राऊत व स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी पाहणी केली. दोन दिवसांत ड्रेनेज लाईन पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून सव्वाचार कोटी रुपये खर्चून शाम सोसायटी ते दुधाळी नाल्यापर्यंत ९०० व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या परताळा या ठिकाणी सानेगुरुजी वसाहतीतून आलेले चार लाख लिटर व शाम सोसायटी नाल्यातून आलेले तब्बल १० एमएलडी पाणी या ड्रेनेज लाईनमधून दुधाळी नाल्याकडे वळविले. दुधाळी येथे २६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात ते सोडले जाणार आहे. मात्र, प्राथमिक चाचणी परीक्षेतच ही ड्रेनेज लाईन सुरू करण्याची घाई केल्याने खरमाती साचून पद्माराजे उद्यानासमोर चोकअप झाली. गाळ साचल्याने पुन्हा सांडपाणी रंकाळ्यात सोडण्यात येत आहे. आजपासून १० पाणबुडी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने चोकअप काढण्याच्या कामास सुरुवात केली. दोन दिवसांत काम पूर्ण होईल, असे एस. बी. कुलकर्णी यांनी सांगितले.
माजगावकर मळा येथे सांडव्या- शेजारी आठ फूट खोल व साडेचार फूट रुंदीची चर मारण्याचे काम उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे. यातून दुधाळीकडे पाणी वळविण्यात येणार आहे. आठ दिवसांनंतर रंकाळ्यातील किमान आठ फूट पाण्याची पातळी यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. महापौरांनी चर मारण्याच्या ठिकाणची पाहणी केली. (प्रतिनिधी)