कोल्हापूर : रेणुकादेवीच्या यात्रेत मानापमानावरून काही तृतीयपंथीयांमध्ये होणारी हाणामारी, ओढ्यावरील मंदिराचा ताबा घेण्यावरून दोन गटात झालेली धुमश्चक्री आणि यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याने नागरिकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होत आहे. काही मोजक्या तृतीयपंथीयांच्या हुल्लडबाजीमुळे श्रद्धेला बीभत्स रूप येत असल्याची नाराजी भाविकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ओढ्यावरील मंदिरात झालेल्या मारामारी प्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.रेणुकादेवीच्या यात्रेत शहरातून मानाच्या जगांची मिरवणूक निघते. यात शहरासह आसपासच्या जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसह भाविक सहभागी होतात. यातील काही गटांमध्ये संघर्ष वाढल्याने मिरवणुकीत मानापमानाचे नाट्य रंगते. जग उचलण्यावरून आणि मिरवणुकीत पुढे जाण्याच्या कारणातून वाद होतात. सोमवारी दुपारी असाच प्रकार घडल्याने मिरवणुकीत तृतीयपंथीयांमध्ये हाणामारी झाली. वादांमुळे मिरवणूक रेंगाळली.रात्री उशिरा ओढ्यावरील यल्लम्मा मंदिराचा ताबा घेण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीमुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. बीभत्स आणि हिडीस प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली. हुल्लडबाजीमुळे सलग तिसऱ्या वर्षी मिरवणुकीला गालबोट लागल्याचे नागरिकांनी सांगितले.तृतीयपंथीयांचा गैरवापरशहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तृतीयपंथी भिक्षेच्या रूपाने नागरिकांकडून पैसे गोळा करतात. हीच बाब लक्षात घेऊन काही तरुण तृतीयपंथीयांच्या गटांचे म्होरके बनत आहेत. त्यांना भिक्षा मागण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यांच्याकडून काही गैरप्रकार करवून घेतले जातात. यातून त्यांच्यातील काही गटांमध्ये संघर्ष वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोल्हापुरात हुल्लडबाज तृतीयपंथीयांकडून श्रद्धेला बीभत्स रूप; सलग तीन वर्षे यात्रेला गालबोट, भाविक वैतागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:07 IST