पन्नास टक्के फी कमी करा, भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 15:58 IST2021-06-18T15:55:37+5:302021-06-18T15:58:49+5:30
Education Sector Bjp Kolhapur : चालू शैक्षणिक वर्षातील फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपतर्फे शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी संस्थाचालकांसोबत सोमवारी दुपारी ४ वाजता बैठक् घेण्याचे आश्वासन दिले.

कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांना निवेदन देताना भाजपचे महेश जाधव, राहूल चिकोडे, विजय जाधव, हेमंत आराध्ये आदी उपस्थित होते. (छाया: नसीर अत्तार)
कोल्हापूर : चालू शैक्षणिक वर्षातील फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपतर्फे शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी संस्थाचालकांसोबत सोमवारी दुपारी ४ वाजता बैठक् घेण्याचे आश्वासन दिले.
दिड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. यामुळे आर्थिक चक्र मंदावले आहे. गोरगरीब, मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दरम्यान, सोमवार पासून शैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होताच शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.
यापूर्वीही भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी निवेदनाव्दारे लक्ष वेधले होते. यावर शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्थाचालकांकडून कार्यवाही झालेली नाही. पण यापुढे जर शैक्षणिक फी सवलतीबाबत योग्य ती समाधानकारक कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना फी विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडले. मागण्यांचे फलक हातात घेवून लक्ष वेधले.
निवेदन देताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप म्हेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई आदी उपस्थित होते.