Kolhapur: गगनबावड्यातील निवडेत आढळला दुर्मीळ काळतोंड्या बिनविषारी सर्प, तालुक्यात प्रथमच नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:12 IST2024-12-11T12:12:31+5:302024-12-11T12:12:57+5:30
वनविभागाने सोडले जंगल अधिवासात

Kolhapur: गगनबावड्यातील निवडेत आढळला दुर्मीळ काळतोंड्या बिनविषारी सर्प, तालुक्यात प्रथमच नोंद
कोल्हापूर : अत्यंत दुर्मीळ असा काळतोंड्या नावाचा बिनविषारी साप गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील शुभम आळवेकर यांच्या घरी आढळून आला. गगनबावडा वनविभागाच्या साळवण येथील रेस्क्यू टीमचे समाधान व्हाेवळे यांनी या सर्पाची रजिस्टरमध्ये नोंद करून त्याला जंगल अधिवासात साेडून दिले.
निसर्गाच्या जैवविविधतेने नटलेल्या गगनबावडा परिसरात अनेक पशुपक्षी सरीसृप आढळतात, परंतु या तालुक्यात पहिल्यांदाच दुर्मीळ काळतोंड्या सापाची नोंद झाली आहे. येथील सर्पमित्र महादेव पानारी यांना तालुक्यातील निवडे येथील शुभम आळवेकर यांच्या घरी साप आल्याची माहिती कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून हा साप रेस्क्यू केला.
या सापाविषयी जास्त माहिती उपलब्ध नसल्यामुळे सर्पतज्ज्ञ शोएब बोबडे, गणेश कदम यांच्याकडून त्याची अधिक माहिती घेण्यात आली. हा साप गगनबावडा वनविभागाच्या साळवण येथील रेस्क्यू टीमचे समाधान व्होवळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. त्यांनी या सापाची नोंद गगनबावडा (साळवण) वनविभागाच्या रजिस्टरमध्ये नोंदविल्यानंतर या सापाला त्याच्या जंगल अधिवासात सोडण्यात आले.
दुर्मीळ कृष्णशीर्ष साप बिनविषारी
या दुर्मीळ सापाला काळतोंड्या या नावाने ओळखले जातो. हा बिनविषारी साप असून, याला कृष्णशीर्ष असेही म्हटले जाते. याला इंग्रजीत ड्युमरील्स ब्लॅक हेडेड स्नेक असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव सिबोनोपीस सबकटेटअस् असे आहे. याची लांबी एक ते दीड फूट असते. याचा रंग लालसर तपकिरी असून, शरीरावर छोट्या काळ्या ठिपक्याची रांग असते. काळे डोके, लांब गोलाकार शरीर आणि लांब निमूळती शेपूट हे याचे वैशिष्ट्य आहे. लहान किडे, वाळवी, मुंग्याची अंडी खाऊन तो उपजीविका करतो. अंडी देणारा हा साप देशाच्या मध्यभागापासून दक्षिणेपर्यंत आढळतो. दगडाखाली, लाकडाखाली, पालापाचोळ्यात राहणारा हा साप दिनचर आहे.