कोल्हापूर महानगरपालिकेतील अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती वादात, सेवाज्येष्ठताही डावलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:53 IST2025-07-10T17:53:16+5:302025-07-10T17:53:31+5:30
हर्षजित घाटगे पुन्हा जलअभियंता

कोल्हापूर महानगरपालिकेतील अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती वादात, सेवाज्येष्ठताही डावलली
कोल्हापूर : महानगरपालिकेतील शहर अभियंतापद बुधवारी पुन्हा एकदा वादात सापडले. अवघ्या दीड महिन्यापूर्वी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ज्या हर्षजित घाटगे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा कार्यभार दिला, त्यांनीच तो काढून घेत सेवाज्येष्ठतेने कनिष्ठ असलेल्या रमेश मस्कर यांच्याकडे सोपविला. नगरविकास विभागातील उपसचिव यांच्या आदेशानेच हा कार्यभार मस्कर यांच्याकडे दिला आहे. मस्कर यांच्याकडे हा कार्यभार दिला जावा यासाठी सरकारमधील काही लोक सक्रिय होते.
नेत्रदीप सरनोबत दि. ३१ मे २०२५ निवृत्त झाल्यानंतर एक जूनपासून प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सेवाज्येष्ठतेने वरिष्ठ असल्यामुळे जलअभियंता असलेल्या हर्षजित घाटगे यांच्याकडे हा कार्यभार सोपविला. घाटगे हे मुळ कार्यकारी अभियंता आहेत. घाटगे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यानंतर उपशहर अभियंता असलेल्या रमेश मस्कर यांच्याकडे जल अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.
परंतु, मस्कर या पदावर काम करण्यास नाखूश होते. तेव्हापासून मंत्रालय पातळीवर त्यांनी शहर अभियंता पदावर नियुक्तीसाठी प्रयत्न चालविल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. बुधवारी सायंकाळी प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी घाटगे व मस्कर यांचे कार्यभार बदलल्याचा आदेश काढल्याने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.
घाटगे यांच्याकडील कार्यभार काढून तो मस्कर यांच्याकडे देताना कोणतेही स्पष्ट कारण प्रशासकांनी दिलेले नाही. अमृत योजनेची कामे ९० टक्के पूर्ण झाली असून, ही कामे पूर्ण होईपर्यंत घाटगे यांच्याकडे जल अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे प्रशासकांच्या आदेशात म्हटले आहे.
दोन वेळा न मागता नियुक्ती, दूरही केले
हर्षजित घाटगे महापालिकेत सर्वांत ज्येष्ठ अभियंता असून, त्यांची नियुक्ती कार्यभारी अभियंता अशी आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नेत्रदीप सरनोबत यांना बाजूला केल्यानंतर घाटगे यांच्याकडे कार्यभार दिला. वर्षभर काम पाहिल्यानंतर सरनोबत यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे सरनोबत निवृत्त झाल्यानंतर पुन्हा घाटगे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला. दोन वेळा न मागता शहर अभियंता पदाचा कार्यभार दिला आणि नंतर तो अपमानास्पदरीत्या काढून घेतल्यामुळे घाटगे नाराज झाले असल्याची चर्चा आहे.
सरकारचा हस्तक्षेप..
महापालिका अधिकाऱ्यांच्या खात्याअंतर्गत बदल्या करण्याचा, खाते वाटप करण्याचा अधिकार हा प्रशासक यांचा आहे. ९२ वी ९३ वी घटना दुरुस्ती करताना राज्य सरकारचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून महापालिकांना स्वायत्तता देण्यात आली. परंतुु, नेत्रदीप सरनोबत व हर्षजित घाटगे यांना या पदावरून दूर करताना नगरविकास विभागाने आदेश दिल्यामुळे प्रशासकांच्या अधिकाराचे अवमूल्यन झाले असल्याचे सांगण्यात येते.
मस्कर यांची नियुक्ती ही कुण्या पुढाऱ्याची सुपारी
नगररचना विभागात कार्यरत असताना रमेश मस्कर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून, त्यांच्या दोन चौकशी सुरू आहेत. अशा माणसाला शहर अभियंता या संवैधानिक पदावर बसविण्यात उठाठेव करणाऱ्या कोणीतरी पुढाऱ्याने सुपारी घेतली आहे, त्याचाही पर्दाफाश करू, असा इशारा माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोणाला नेमायचे सरकारला अधिकार - मस्कर
दरम्यान, रमेश मस्कर यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्यावर कसलेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. कसली चौकशीही सुरू नाही. सरकारने माझ्याकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कायमची नियुक्ती केलेली नाही. त्यात चुकीचे काहीही नाही. ‘एमसीएसआर’च्या कलम ४५ नुसार तो अधिकार सरकारला आहे. महादेव फुलारी, सुरेश पाटील, एन. एस. पोवार हे कनिष्ठ अभियंता असूनही त्यांच्याकडे उपशहर अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तशाच पद्धतीने सरकारकडून माझ्याकडेही शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
मस्कर यांच्याकडे कार्यभार दिल्याचे पडसाद महापालिका वर्तुळात उमटले असून, अधिकारी वर्गातही नाराजी आहे. आम्ही काही माजी नगरसेवक प्रशासकांना भेटून मस्कर यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी करणार आहोत. तिथे दखल घेतली नाही तर उच्च न्यायालयात जाऊ - प्रा. जयंत पाटील माजी नगरसेवक, कोल्हापूर.