बचत गटांना देण्यात येणारे राजमाता जिजाऊ पुरस्कार बंद; ‘ग्रामविकास’ कधी घेणार निर्णय?
By समीर देशपांडे | Updated: February 8, 2024 12:43 IST2024-02-08T12:42:49+5:302024-02-08T12:43:20+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : एकीकडे महिलांच्या सबलीकरणाच्या घोषणा केल्या जात असताना, महिला बचत गटांसाठी सुरू असलेले राजमाता जिजाऊ स्वावलंबन ...

बचत गटांना देण्यात येणारे राजमाता जिजाऊ पुरस्कार बंद; ‘ग्रामविकास’ कधी घेणार निर्णय?
समीर देशपांडे
कोल्हापूर : एकीकडे महिलांच्या सबलीकरणाच्या घोषणा केल्या जात असताना, महिला बचत गटांसाठी सुरू असलेले राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनाने बंद केले आहेत. यंदाचे ‘सरस महालक्ष्मी’सह अन्य महोत्सव विनापुरस्कार पार पडले असून, ग्रामविकास विभाग याबाबत कधी निर्णय घेणार, अशी विचारणा केली जात आहे.
ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामोन्नती अभियानाच्या माध्यमातून राज्यातील महिला बचत गट चळवळीला गती दिली जात आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी दरवर्षी जिल्हा पातळीवर महोत्सवांचे आयोजन केले जाते. त्याच पद्धतीने एक विभागीय आणि राज्यस्तरावर ‘महालक्ष्मी सरस’ या नावाने प्रदर्शन घेतले जाते, यासाठी भरीव निधीचीही तरतूद करण्यात येते. त्यानुसार, २०१९ पर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते.
परंतु २०१९ नंतर कोरोनामुळे सर्व महोत्सव रद्द करण्यात आले. त्यामुळे पुरस्कार वितरणाचा प्रश्नच आला नाही. नंतर आता राज्यपातळीवरील ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन नुकतेच मुंबई येथे पार पडले, परंतु या प्रदर्शनात राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्याची परंपरा खंडित करण्यात आली. यावेळी विभागात प्रथम क्रमांक पटकावलेल्या बचत गटांचा आणि बचत गटविषयक लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो, परंतु यंदा यातील काहीच केले गेले नाही.
राज्यपातळीवर पुरस्कारासाठी महिला बचत गटांची नावे न मागविल्याने जिल्हा पातळीवरही कुणीच याबाबत निर्णय घेतला नाही. परिणामी, कोरोनानंतर सुरू झालेल्या महोत्सवातही पुरस्कारांचे वितरण झाले नाही. वास्तविक त्या-त्या जिल्ह्याने आपल्या वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये बक्षिसाची रक्कम गृहित धरून नियोजन करणे आवश्यक आहे, परंतु तसे हाेताना दिसत नाही. त्यामुळेच दरवर्षी हौसेने नटून थटून शिल्ड, ढाल, सन्मानचिन्ह घ्यायला स्टेजवर जाणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्यांचा हिरमोड झाला आहे.
अशी आहेत बक्षिसे
- तालुका पातळी : ५, ३, २ हजार रुपये
- जिल्हा पातळी : १०, ७, ५ हजार रुपये
- विभागीय पातळी : २५, १५, १० हजार रुपये
दरवर्षी चांगले काम केल्याबद्दल महिला बचत गटांचा सत्कार केला जातो, परंतु ही योजना आता बंद आहे. ते पुरस्कार शासनाने पुन्हा सुरू करावेत. - हमिदा बंडगल अध्यक्ष, आयेशा महिला बचत गट चिंचवाड ता.करवीर, जि.कोल्हापूर