५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 20:51 IST2025-12-13T20:40:30+5:302025-12-13T20:51:38+5:30
एक ग्रॅम ही वजनात फरक नाही इतक्या सुबकतेने ते चप्पल तयार करतात.

५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
दुर्वा दळवी
कोल्हापुरच्या कागल तालुक्यातील बानगे गावचे राजेंद्र गोविंदा शिंदे यांचा वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय कोल्हापुरी चप्पल तयार करण्याचा. खरेतर त्यांना व्हायचे होते शिक्षक परंतु आर्थिक पाठबळ न मिळाल्याने त्यांनी वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरची नावाजलेली हस्तकला म्हणजे कोल्हापुरी चप्पल. ही चप्पल बनविणे म्हणजे एकाग्रात आणि कौशल्याचे काम. याच कोल्हापुरी चप्पल बनविण्यात राजेंद्र यांचा हातखंडा. आजवर त्यांनी तयार केलेल्या कोल्हापुरी चप्पल याचे एक वैशिष्ट्य असे की दोन्ही चपलांचे वजन हे सारखेच असते. एक ग्रॅम ही वजनात फरक नाही इतक्या सुबकतेने ते चप्पल तयार करतात.
शिंदे यांच्या कलेची ख्याती थेट जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड प्राडाच्या देशात अर्थात इटलीपर्यंत पोहोचली. राजेंद्र यांच्या कलाकृतीची भुरळ इटलीतील एका नागरिकाला पडली नि त्याने एका अटीवर कोल्हापुरी चप्पल बनविण्यास सांगितली. तर ती अट ही होती की आजपर्यंत कोणीही बनविले नाही असे कोल्हापुरी चप्पल बनवावे तसेच कारागिराने ही असे चप्पल आजवर बनवलेले नसावे. एकमेव असे हे चप्पल असावे जे कोणाकडे ही मिळणार नाही अशा पद्धतीने ते कारागिराने बनवावे. हे चप्पल बनविण्याचा निर्णय राजेंद्र यांनी घेतला आणि एक वैशिष्ट्यपूर्ण, सुबक आणि वजनाला हलके असे रुबाबदार कोल्हापुरी चप्पल तयार केले.
हे चप्पल तयार करण्यासाठी राजेंद्र यांनी २० दिवस कष्ट घेतले. यातील एका चपलचे २११ ग्रॅम इतके वजन आहे हेच वजन दुसऱ्याही चपलेचे आहे. यावरूनच लक्षात येते की चप्पल बनविण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे ते. ही चप्पल आणखीन खास ठरली ती त्यावर केलेल्या सुबक नक्षीकाम आणि त्यावरील चकाकीने. चपलेच्या वरील आणि खालील बाजूस त्यांनी नक्षीकाम केले आहे. चपलेच्या तळाला असलेले नक्षीकाम चप्पल कितीही वापरली तरी ते न झिजणारे असे आहे. चपलेवर दोन प्रकारची नक्षीदार पाने असून १ एमएमच्या २० वेण्या चपलेवर आहेत. तसेच या संपूर्ण चपलेला गोट लावण्यात आला आहे. असे हे नाविन्यपूर्ण, उत्कृष्ट असा हस्तकलेचा नमुना असलेले एकमेव कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालेले कोल्हापुरी चप्पल आहे असे राजेंद्र यांनी सांगितले.
राजेंद्र शिंदे यांनी सर्वोत्कृष्ट कोल्हापुरी चप्पल बनविण्याचा घेतलेला ध्यास नुकत्याच एका प्रदर्शनाने अधोरेखित झाला. राजेंद्र यांनी बनविलेली ही वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापुरी चप्पल नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये ही सर्वोत्कृष्ट ठरली आहे. तसेच या चप्पलची किंमत तब्बल ५१ हजार रुपये करण्यात असून ही चप्पल आता थेट इटली देशात जाणार आहेत. त्यामुळे स्वतःच्या नावाने कोल्हापुरी चप्पल खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राडाच्या देशात सर्वोत्कृष्ट नक्षीकाम केलेले रुबाबदार चप्पल आपले अस्तित्व दाखविणार आहे.
कोल्हापुरचे सर्वांत सुंदर चप्पल इटलीत जाणार
कोल्हापुरच्या कागलमधील बानगे या गावात तयार करण्यात आलेले हे देखणे चप्पल. ज्या चप्पलवर सूक्ष्म पद्धतीने नक्षीकाम करण्यात आलेले हे एकमेव कोल्हापुरी चप्पल आहे. गोट, कान, वेण्या, मोती आणि चपलेची चमक पाहता अतिशय सुबक अशीही कलाकृती अनेकांना भुरळ घालणारी अशीच आहे. अतिशय मेहनतीने तयार केलेले हे चप्पल इटलीतील एका नागरिकाच्या खास मागणीवरून तयार करण्यात आले आहे.
विमान प्रवास करून जाणार कोल्हापुरी चप्पल
कोल्हापुरातील कारागीर राजेंद्र शिंदे यांनी घडवलेले नक्षीदार ५१००० हजार रुपयांचे हे कोल्हापुरी चप्पल लवकरच इटलीला जाणार आहे. त्यासाठी चप्पल विमान प्रवास करणार आहे. कोल्हापुरच्या कलेच्या प्रेमात पडलेल्या इटालियन ग्राहकाने त्याच्या करियरचा खर्च ही उचलला हे विशेष.
आता वर्ल्ड रेकॉर्डसाठी कोल्हापुरी चप्पल घडणार
सर्वोत्कृष्ट नक्षीकाम असलेली चप्पल तयार करून राजेंद्र शिंदे यांना आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कोल्हापुरी चप्पलच्या नावावर नोंद करायवयाचा आहे. लवकरच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणारी चप्पल घडविणार असा मानस शिंदे यांनी व्यक्त केला.