पावसाचा जोर वाढला, पंचगंगा इशारा पातळीच्याही खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 19:21 IST2021-07-30T19:20:19+5:302021-07-30T19:21:42+5:30
Rain Kolhapur : चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. पावसाने पुनरागमन केल्याने महापूर ओसरण्याचा वेगही कमी झाला असून मदतकार्यातही अडथळे येत आहेत. पूर ओसरलेल्या भागात या पावसाने चिखलाचा काला झाल्याचे दिसत आहे.

पावसाचा जोर वाढला, पंचगंगा इशारा पातळीच्याही खाली
कोल्हापूर : चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. पावसाने पुनरागमन केल्याने महापूर ओसरण्याचा वेगही कमी झाला असून मदतकार्यातही अडथळे येत आहेत. पूर ओसरलेल्या भागात या पावसाने चिखलाचा काला झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान पंचगंगा नदी शुक्रवारी दुपारनंतर ३९ फूट या इशारा पातळीच्या खालून वाहू लागली. भोगावती वगळता सर्वच नद्या अजूनही पात्राबाहेरूनच वाहत असल्याने नदीकाठ पाण्याखालीच आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या तीन दिवसांच्या ढगफुटीसारख्या पावसाने महापुराचे सर्वच रेकॉर्ड मोडले. सोमवारपासून पावसाने उसंत घेतल्याने महापुराचा विळखा वेगाने सैल होत होता; पण दोन-तीन दिवसांच्या उघडिपीनंतर लगेच गुरुवारी रात्रीपासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने पुरातून सावरण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नावर पाणी फिरू लागले आहे. अजूनही जिल्ह्यातील ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. ३० च्या वर वाहतूक मार्ग बंद आहेत, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना अजूनही पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे, अशा परिस्थितीत पावसाची उसंत अपेक्षित होती.
पूर ओसरेल तसे लोक निवारागृहातून घराकडे परतत होते, स्वच्छता सुरू होती; पण शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे या सर्वांच्या प्रयत्नांत व्यत्यय आला आहे. पूरग्रस्त भागात आधीच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, या पावसाने त्याचा अक्षरश: काला झाला असून तो रस्त्यावर पसरल्याने दैन्यावस्थेत आणखी भर पडली आहे.
कसबा बावडा ते शिये मार्ग खुला
पंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता ३७.७ फुटांपर्यंत खाली आली आहे. पाणी कमी झाल्याने कसबा बावडा ते शिये या मार्गावरील वाहतूक आठवडाभरानंतर सुरू झाली आहे; पण अजूनही रस्त्यावर गाळ व शेवाळ असल्याने रस्ता निसरडा झाला आहे.