पाऊस थांबला, धरणातील विसर्गही घटला, राधानगरीचे दोन दरवाजे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 17:03 IST2019-09-11T17:02:01+5:302019-09-11T17:03:41+5:30
महापुराच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेल्या पावसाने बुधवारी किरकोळ सरी वगळता पूर्णत: विश्रांती घेतली. पाऊस थांबल्याने सर्वच धरणातून विसर्गही बंद झाला आहे. राधानगरी धरणाचे सुरु असलेले दोन स्वयंचलित दरवाजे बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद झाले.

पाऊस थांबला, धरणातील विसर्गही घटला, राधानगरीचे दोन दरवाजे बंद
कोल्हापूर: महापुराच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेल्या पावसाने बुधवारी किरकोळ सरी वगळता पूर्णत: विश्रांती घेतली. पाऊस थांबल्याने सर्वच धरणातून विसर्गही बंद झाला आहे. राधानगरी धरणाचे सुरु असलेले दोन स्वयंचलित दरवाजे बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद झाले.
अलमट्टी धरणातूनही तब्बल १ लाख ४१ हजार क्यूसेकने विसर्ग कमी झाला आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही घट होत असून पंचगंगेची पातळी ३८.११ फुटापर्यंत खाली आली आहे. कालच्या तुलनेत आणखी १५ बंधारे खुले झाले असून ३४ बंधारे अद्याप पाणीखाली आहेत.
गेल्या आठवड्याच्या उत्तरार्धात जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अवघ्या तीन चार दिवसाच्या पावसाने सर्वच नद्यांना पूर येऊन पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, वारणेसह सर्वच प्रमुख नद्या इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या दिशेने वाहू लागल्या होत्या.
राधानगरीच्या सात स्वयंचलित दरवाजासह सर्वच धरणातून विसर्ग वाढवल्याने पाणीपातळी वाढून पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरीकांनी स्थलांतरही सुरु केले. दरम्यान सोमवारपासून पावसाचा जोर ओसरु लागला. मंगळवारीही पावसाने उसंत घेतली. बुधवारी दिवसभर किरकोळ सरी वगळता पावसाने उघडीप घेतली.
दरम्यान बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८.९७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक ५१ मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात तर सर्वात कमी १.१३ मिलिमीटर पाऊस हातकणंगले झाला आहे. शिरोळ पूर्णपणे निरंक आहेत. पन्हाळा ९, शाहूवाडी १५, राधानगरी ८, भूदरगड ४, कागल व करवीर प्रत्येकी २, गडहिग्लज १, आजरा ६, चंदगड ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
-