हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी संतशक्तीने पाठबळ द्यावे, देवेंद्र फडणवीस यांनी केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:22 IST2024-10-01T12:22:08+5:302024-10-01T12:22:33+5:30
सिद्धगिरी मठावर ‘संत समावेश’ कार्यक्रम

हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी संतशक्तीने पाठबळ द्यावे, देवेंद्र फडणवीस यांनी केले आवाहन
कोल्हापूर-गोकूळ शिरगाव : एकीकडे जगभरामध्ये भारत देश प्रगतीची शिखरे गाठत आहे. दुसरीकडे देशात सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. हे पाहवत नसल्याने हिंदूविरोधी वातावरण तयार करण्याचे जागतिक षडयंत्र रचले जात आहे. लव्ह जिहादच्या पाठोपाठ व्होट जिहादचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले आहे. त्यामुळेच या हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी संतशक्तीने पाठबळ द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथून जवळच असलेल्या कणेरी येथील सिद्धगिरी मठावर आयोजित ‘संत समावेश’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी राज्यभरातून विविध संत, महंत आणि सांप्रदायिक प्रमुखांची उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, शिकागोच्या परिषदेत विवेकानंदांनी हिंदू संस्कृतीचे आदर्श रूप जगाला दाखवले. इतर धर्मावर आक्रमण न करणाऱ्या या हिंदू समाजावर मात्र आता अनेक बाजूंनी आक्रमणे होत आहेत. अशावेळी संतशक्तीने आपले विश्वरूप दाखवून सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
गेल्या काही वर्षांमध्ये जाणीवपूर्वक संतांचा अवमान करण्याचे, बदनामीचे प्रकार सुरू आहेत. चुकीचे चित्रण केले जात आहे. जेव्हा धर्म कमजोर झाला तेव्हा आपण गुलामीत गेलो हा इतिहास आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्माविषयी सर्वसामान्यांमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकण्याची जबाबदारी संतांनी घ्यावी.
यावेळी संकेश्वर येथील विद्यानृसिंह शंकराचार्य, संजय महाराज पाचपोर, कमलाकांताचार्य महाराज, माधव महाराज राठी, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, सत्यजित कदम, राहुल आवाडे, विश्वस्त उदय सावंत, विजय जाधव, माणिक पाटील चुयेकर, प्रताप कोंडेकर उपस्थित होते.
गांधी, पवारही मंदिरात जाऊ लागले
भारतात अनेक राजकीय नेते पूर्वीच्या काळात मंदिरात लपून छपून जात होते. परंतु, नरेंद्र मोदी जेव्हा मंदिरात जाऊन पूजा, अभिषेक करू लागले आणि त्याचे थेट प्रक्षेपण सुरू झाले तेव्हापासून पूर्वी मंदिरात न जाणारे राहुल गांधी, शरद पवारही मंदिरात जायला सुरुवात झाली. शरद पवार यांनी ५० वर्षांनी अध्यात्मिक आघाडीही सुरू केली. संतांच्या संघटित शक्तीचा हा परिणाम आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.