साडेतीन हजाराशिवाय कांडे तोडू देणार नाही - रघुनाथदादा पाटील कोल्हापुरातील ऊस परिषदेत इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 20:59 IST2018-10-10T20:57:45+5:302018-10-10T20:59:14+5:30
आगामी हंगामात विना कपात प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि साडेचार हजार रुपये अंतिम दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या एका कांड्यालाही हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला

शेतकरी संघटनेची ऊस परिषद बुधवारी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात झाली. यामध्ये उसाला एकरकमी साडेतीन हजार रुपये पहिली उचल घेतल्याशिवाय उसाचे कांडे तोडू न देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी वंदना माळी, अॅड. माणिक शिंदे, रघुनाथदादा पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर : आगामी हंगामात विना कपात प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि साडेचार हजार रुपये अंतिम दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या एका कांड्यालाही हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. सरकार व कारखानदारांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवाल तर याद राखा, असेही त्यांनी संघटना नेत्यांना ठणकावून सांगितले.
शेतकरी संघटनेची ऊस परिषद बुधवारी शाहू स्मारक भवनात झाली, त्यावेळी पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारसह शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर आरोपांची तोफ डागली. रघुनाथदादा पाटील म्हणाले, राज्यकर्त्यांनी एफआरपी ८.५ टक्क्यांवरून १० टक्के केल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
यंदा साखरेचे उत्पादन जास्त असल्याचा कांगावा काही मंडळी करत आहेत; पण वस्तुस्थिती वेगळी असून अतिवृष्टीने उसाचे उत्पादन घटणार आहे. गेल्यावर्षी राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांबरोबर एफआरपी अधिक दोनशे रुपयांवर तडजोड केली; पण शेतकऱ्यांच्या हातात कशी-बशी एफआरपी पडली, उर्वरित दोनशे रुपये कोण देणारऱ्याचा जाब शेतकºयांनी राजू शेट्टींना विचारला पाहिजे. या हंगामातही ‘एफआरपी’चे तुकडे करण्याची भाषा सरकारधार्जिण शेतकरी संघटना करत आहेत. गुजरात व महाराष्टत साखरेचे भाव सारखेच, कायदे, धोरणे सारखीच असताना दरात फरक कसा? त्यामुळे कोणी काहीही वल्गना केल्या तरी विनाकपात प्रतिटन साडेतीन हजार पहिली उचल घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
जयसिंगपूरची ‘ऊस परिषद राष्टवादी’प्रणित
‘स्वाभिमानी’च्या निर्मितीमागे शरद पवार, विलासराव देशमुख होते, हे गेले अनेक वर्षे सांगत आलोय. येथून पाठीमागे जयंत पाटील हे शेट्टींना पडद्यामागे राहून मदत करायचे, आता उघड करणार एवढाच फरक आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ची जयसिंगपूरची ऊस परिषद ही राष्टवादी तर सदाभाऊ खोत यांची वारणानगरची परिषद भाजपप्रणित असल्याचा आरोप पाटील यांनी केला.