कोल्हापूर : हुपरी येथील जुगार अड्डयावर केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी ७० हजारांची लाच घेणारा पंटर रणजित आनंदा बिरांजे (वय ३८, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला. पंटरकरवी लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे (रा. कोल्हापूर) याचा एसीबीकडून शोध सुरू आहे. एसीबीकडून लाचविरोधी जनजागृती सप्ताह सुरू असतानाच शनिवारी (दि. १) दुपारी बाराच्या सुमारास पट्टणकोडोली येथे बिरांजे याच्या घरीच ही कारवाई झाली.एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुपरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल संदेश शेटे याने अन्य दोन अंमलदारांसह गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी हुपरी येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने जुगार खेळणा-या एका व्यक्तीकडे एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी दिवसभरात तडजोडीअंती ७० हजार रुपये पंटर रणजित बिरांजे याच्याकडे देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिका-यांनी सापळा लावण्याचे ठरवले. हुपरी पोलिस ठाण्यात पंटरगिरी करणारा बिरांजे याने तक्रारदारास पट्टणकोडोली येथील घरीच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारी बिरांजे याच्या घराजवळ सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ त्याला पकडले. पंटरकरवी लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल शेटे हा साप्ताहिक सुट्टी असल्याने पोलिस ठाण्यात मिळाला नाही. कारवाईची चाहूल लागताच तो मोबाइल बंद करून पसार झाल्याची माहिती हुपरी पोलिसांकडून मिळाली.
Web Summary : A gambler was caught in Kolhapur accepting a bribe of ₹70,000 to suppress a gambling case. A police constable, who demanded the bribe, is on the run. Anti-Corruption Bureau is investigating.
Web Summary : कोल्हापुर में जुआ मामला दबाने के लिए 70 हजार की रिश्वत लेते जुआरी पकड़ा गया। रिश्वत मांगने वाला पुलिस कांस्टेबल फरार है। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो जांच कर रही है।