Kolhapur: पदवीधरसाठी शिक्षक मतदार हायटेक; मात्र, नोंदणी पारंपरिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:52 IST2025-10-10T17:52:08+5:302025-10-10T17:52:31+5:30
गैरसोयीमुळे बेजार : ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू करण्याची मागणी

Kolhapur: पदवीधरसाठी शिक्षक मतदार हायटेक; मात्र, नोंदणी पारंपरिक
कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये शिक्षकांसाठी मतदार नोंदणीची व्यवस्था केवळ ऑफलाईन म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच केली जात आहे. सार्वत्रिक निवडणुकीत मतदार अल्पशिक्षित असताना ऑनलाईन मतदार नोंदणीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याउलट शिक्षित, उच्चशिक्षित, हायटेक मतदार असूनही शिक्षक मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. ऑफलाईन नोंदणीसाठी त्यांना शासकीय कार्यालयात जावे लागत आहे.
पुणे पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी पात्र असते. यामुळे जुन्या आणि नवीन मतदारांना नोंदणीसाठी धावपळ करावी लागत आहे. एक नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्षांपूर्वी पदवी घेतलेले नवीन मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधरसाठी https://mahaelection.gov.in यावरून ऑनलाईन नोंदणी करता येते.
मात्र शिक्षक मतदार नोंदणीसाठी अद्याप अशा कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा नाही. यामुळे शिक्षकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करून शासकीय कार्यालयात जावून मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. शिक्षक मतदारही ऑनलाईन सुविधा सुरू करावी, अशी मागणी करीत आहेत. त्यांची मागणी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. मात्र अजून सुविधा सुरू झालेली नाही.
सहा नोव्हेंबर मतदार नोंदणीची अंतिम मुदत
मतदार नोंदणीची अंतिम मुदत सहा नोव्हेंबर आहे. २५ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या शासकीय सुट्टीचा दिवस वगळता इतर दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जात आहे.
पुणे पदवीधरसाठी शिक्षक मतदार नोंदणीची केवळ ऑफलाईन प्रक्रिया राबवली जात आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा आहे. -शक्ती कदम, प्रभारी उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग