दूध अनुदानात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत किती कोटींचे वाटप झाले..वाचा
By राजाराम लोंढे | Updated: December 19, 2024 14:00 IST2024-12-19T13:59:34+5:302024-12-19T14:00:27+5:30
सात रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा

दूध अनुदानात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत किती कोटींचे वाटप झाले..वाचा
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत राज्यात वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहे. शासनाने तरतूद केलेल्या ७५८ कोटींपैकी ११० कोटी ८४ लाख रुपये सप्टेंबरअखेरचे अनुदान देय आहे. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अनुदान द्यावे लागणार आहे.
गाय दूध खरेदी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान दूध उत्पादकांना देण्याचा निर्णय घेतला. ११ मार्च ते ३० जूनपर्यंत दूध अनुदान बंद केले होते. त्यानंतर १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनुदानात वाढ करून ऑक्टोबर व नोव्हेंबरसाठी सात रुपये केले.
पहिल्या टप्प्यातील ५३४ कोटी १७ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदानापैकी ११० कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये शेतकऱ्यांना देय आहे. त्यानंतर जवळपास ६४८ कोटी रुपये हे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील दुधासाठी द्यावे लागणार आहेत. राज्य शासनाने ७५८ कोटींची तरतूद केली असून दुधाची माहिती भरल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
कोल्हापूरपेक्षा सातारा अनुदानात पुढे
विस्ताराने व दूध उत्पादनात सातारापेक्षा कोल्हापूर पुढे आहे. तरीही दूध अनुदानात सातारा पुढे राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण दूध उत्पादनाच्या ५० टक्के दूध हे म्हशीचे आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा दूध अनुदानात राज्यात पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.
जिल्हानिहाय मिळालेले व देय अनुदान
जिल्हा - वाटप - देय
पूणे : १६९.८२ कोटी - १३.७३ कोटी
अहिल्यानगर : १५२.१२ कोटी - २७.८७ कोटी
सोलापूर : ७५.२१ कोटी - १४.५८ कोटी
सातारा : ३९.६७ कोटी - ४.०५ कोटी
कोल्हापूर : २६.७० कोटी - ९.५४ कोटी
सांगली : २२.३९ कोटी - १८.३० कोटी
नाशिक : १७.०५ कोटी - ६.५२ कोटी
छत्रपती संभाजीनगर : १०.५६ कोटी - ५.७३ कोटी
धाराशिव : ६.९२ कोटी - ४.१७ कोटी
बीड : ६.३४ कोटी - ३.०९ कोटी
जळगाव : ५.०८ कोटी - २.२५ कोटी
नागपूर : ७९.०३ लाख - २६.८० लाख
लातूर : ३३.८१ लाख - १४.६७ लाख
जालना : ३१.७९ लाख - २६.२५ लाख
धुळे : २०.६३ लाख - ४.३३ लाख
अमरावती : १८.५४ लाख - ११.८५ लाख
भंडारा : १७.०९ लाख - ६.२३ लाख
बुलढाणा : १४.८० लाख - ३.६६ लाख
वर्धा : ५.७३ लाख- ७५ हजार
परभणी : ३.९३ लाख - ८० हजार
नांदेड : ४६ हजार - शून्य