कोल्हापुरात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था, सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:11 IST2025-10-18T14:10:01+5:302025-10-18T14:11:37+5:30
दर्जाहीन रस्त्यांमुळे मणक्याचे आजार, कमरेचे दुखणे, वाहनांची मोडतोड व धुळीच्या लोटामुळे श्वसनाचे आजार वाढले

कोल्हापुरात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था, सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ७७ रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने नागरिकांच्या जीवन जगण्याच्या हक्काची पायमल्ली झाल्याने त्यावर दाद मागण्यासाठी कोल्हापुरातील सजग नागरिकांच्या वतीने प्रसिद्ध विधिज्ञ ॲड.असिम सरोदे यांनी शुक्रवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली. उदय नारकर, भारती पोवार, डॉ.रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, ॲड.सुनीता जाधव व प्रा.डॉ.तेजस्विनी देसाई हे याचिकाकर्ते आहेत.
यामध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या सचिवांना प्रतिवादी केले आहे. ॲड.सरोदे व नारकर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
कोल्हापूर शहर व उपनगरातील रस्ते खराब आणि दयनीय झाले असून अत्यंत गलथान पद्धतीने रस्ते, गतिरोधक व पॅचवर्क केले आहेत. शहरात कशाही पद्धतीने रस्ते उकरले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहर उद्ध्वस्त शहरासारखे वाटू लागले आहे. या दर्जाहीन रस्त्यांमुळे मणक्याचे आजार, कमरेचे दुखणे, वाहनांची मोडतोड व धुळीच्या लोटामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवन जगण्याच्या हक्काची पायमल्ली झाल्याने ही जनहित याचिका दाखल केल्याचे ॲड.सरोदे यांनी सांगितले.
याची केली मागणी
सुरक्षित प्रवासासाठी चांगले रस्ते उपलब्ध करून द्या, रस्त्यांचे काम सुरू करताना त्याची कालमर्यादा ठरवा, रस्ते करताना ते शास्त्रीय पद्धतीनेच करावेत, महापालिकेने सांडपाणी व्यवस्थापनाचा ड्रेनेज मॅप सादर करावा, जिल्हा रस्ते सुरक्षा समिती तत्काळ गठित करावी अशा मागण्या जनहित याचिकेत नमूद केल्या आहेत.
प्रमुख रस्त्यांची मांडली दुर्दशा
शहरातील शाहूनगर, पांजरापोळ, टाकाळा रोड, मंगळवारपेठ, मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका, फुलेवाडी-बालिंगा, देवकर पाणंद, रंकाळा यांसह ७७ रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत याचिका केली आहे. शहरातील १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांची अपूर्ण कामे, महापालिकेचा कार्यारंभ आदेश यासह ठेकेदार-अधिकारी, राजकीय नेत्यांचे लागेबांधे यामुळे रस्त्यांची होणारी वाताहत याचाही उल्लेख केला आहे.
'लोकमतच्या बातम्या ठरल्या महत्त्वपूर्ण
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत 'लोकमत'ने सातत्याने आवाज उठविला आहे. ही याचिका दाखल करताना 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणेही याचिकाकर्त्यांनी जोडली आहेत. ॲड.सरोदे यांनी याचा आवर्जून उल्लेख केला.