दिव्यांगांच्या उन्नतीसाठी तीन लाख कोटींची तरतूद, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:24 IST2025-09-15T18:23:49+5:302025-09-15T18:24:28+5:30
दिव्यांगांसाठी केएमटीची मोफत सेवा

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी तीन लाख कोटींची तरतूद, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती
कोल्हापूर : देशातील दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने सुमारे ३ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भविष्यात दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
सरकारच्या एडिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांगांसाठीच्या मोफत सहायक उपकरण वाटपप्रसंगी ते बोलत होते. स्वामी विवेकानंद कॉलेजच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन हॉलमध्ये रविवारी कार्यक्रम झाला.
मंत्री आठवले म्हणाले, केंद्र सरकारने दिव्यांगासाठी सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण ठेवले आहे. पूर्वी सात निकषानुसार दिव्यांगांची व्याख्या ठरवली जायची. सन २०११ च्या जनगणनेनुसार २ कोटी ६८ लाख इतकी दिव्यांगांची नोंद झाली. सरकारने २१ निकषानुसार दिव्यांग शब्दाची व्याख्या ठरवली असल्याने भविष्यात या संख्येत वाढ होईल. खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपायुक्त पारितोष कंकाळ, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, कपिल जगताप, सहायक आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आभार मानले.
दिव्यांगांसाठी केएमटीची मोफत सेवा
मनपा क्षेत्रातील २३८ दिव्यांगांना चार विभागीय कार्यालयामार्फत के.एम.टी.ची विशेष मोफत बस सेवा देण्यात आली. त्यांना कार्यक्रम स्थळी ने-आण करण्यासाठी व्यवस्था केली.
साहित्याचे वाटप
दिव्यांगांना इलेक्ट्रिक तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, साध्या तीनचाकी सायकलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद, मनपा तसेच कानपूरच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमने (एलिम्को) केले.