पूरग्रस्तांना घोषित केलेले धान्य, गॅस, रॉकेल द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 16:33 IST2019-11-29T16:32:03+5:302019-11-29T16:33:50+5:30

प्रत्यक्षात पंचनामे होऊन बाधित पूरग्रस्त कुटुंबांना यादीप्रमाणे पैसे मिळाले, काहींना धान्य मिळाले, काहींना मिळाले नाही. रॉकेल देण्याची घोषणा केली; पण कोल्हापूर रॉकेलमुक्त म्हणून गॅस सिलिंडरची मागणी केली; पण तोही मिळाला नाही.

Provide food grains, gas, kerosene declared to flood victims | पूरग्रस्तांना घोषित केलेले धान्य, गॅस, रॉकेल द्या

पूरग्रस्तांना घोषित केलेले धान्य, गॅस, रॉकेल द्या

ठळक मुद्दे रेशन बचाव समिती पुरस्कृत पूरग्रस्त कृती समितीने शहर पुरवठा अधिकाऱ्यांना विचारला जाब

कोल्हापूर : शहराच्या परिसरात आॅगस्ट महिन्यात महापुराने थैमान घातले होते. नैसर्गिक आपत्तीचा विचार करून, शासनाने पंचनामे करून पूरग्रस्त कुटुंबांच्या यादीप्रमाणे तीन महिन्यांचे धान्य, रॉकेल, गॅस घोषित केले. मात्र, यातील काहीजणांना ते मिळाले व काहींना अद्यापही मिळालेले नाही. याबद्दल रेशन बचाव समिती पुरस्कृत २०१९ पूरग्रस्त कृती समितीने शुक्रवारी शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे-जाधव यांना जाब विचारला.

नैसर्गिक आपत्तीचा विचार करून शासनाने तीन महिने महिना प्रती १० किलो गहू, तांदूळ घोषित केले. याशिवाय महिना प्रती पाच लिटर रॉकेल किंवा एक गॅस सिलिंडर घोषित केले होते. प्रत्यक्षात पंचनामे होऊन बाधित पूरग्रस्त कुटुंबांना यादीप्रमाणे पैसे मिळाले, काहींना धान्य मिळाले, काहींना मिळाले नाही. रॉकेल देण्याची घोषणा केली; पण कोल्हापूर रॉकेलमुक्त म्हणून गॅस सिलिंडरची मागणी केली; पण तोही मिळाला नाही.

याबाबत यापूर्वी निवेदन देऊनही पुरवठा प्रशासन दाद देत नाही. शहरातील डी-९०, ईसी -२, ईसी-२४ या दुकानांतील धान्य पूर्ण भिजले. सदर धान्य लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा कायद्याने वेळीच धान्य उपलब्ध करून देणे ही पुरवठा कार्यालयाची जबाबदारी होती. तरीसुद्धा आॅगस्ट महिन्याचे धान्य येथील लाभार्थ्यांना मिळालेच नाही. तरी यादीप्रमाणे धान्य, रॉकेल अथवा गॅस द्यावा. याकरिता शुक्रवारी समितीतर्फे शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे-जाधव यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी व शिंदे-जाधव यांच्यात काही प्रमाणात वादावादी झाली. अखेरीस शहर पुरवठा अधिकारी शिंदे-जाधव यांनी वरिष्ठांशी बोलून याबाबत येत्या आठ दिवसांत निर्णय घेऊ असे सांगितले.

या आंदोलनाचे नेतृत्व चंद्रकांत यादव, राजू लाटकर, शंकर काटाळे यांनी केले. यावेळी रमेश आपटे, सविता संकपाळ, लक्ष्मण वायदंडे, ज्योती माने, रेश्मा चांदणे, सुनीता पाटोळे, विमल ऐवाळे, शांता भोसले, रूपाली आवळे, मीरा साठे, सीमा देवकुळे, आदी उपस्थित होते.

आॅगस्ट महिन्यातील धान्य, रॉकेल, गॅस का मिळाला नाही, याबद्दल रेशन बचाव समिती पुरस्कृत पूरग्रस्त कृती समितीने शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे-जाधव यांना, कोल्हापुरातील शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील शहर पुरवठा कार्यालयात शुक्रवारी जाब विचारला. यावेळी चंद्रकांत यादव यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.
-----------
- सचिन भोसले

Web Title: Provide food grains, gas, kerosene declared to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.