Maratha Reservation-सकल मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 18:39 IST2021-05-05T18:37:04+5:302021-05-05T18:39:08+5:30
Maratha Reservation: मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याबद्दल कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून आत्मक्लेश, निर्दशने, ठिय्या आंदोलन करून बुधवारी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आरक्षणाबाबत योग्य भूमिका सरकारने घ्यावी, अन्यथा तीव्र लढा देण्याचा इशारा या संघटनांनी यावेळी दिला आहे.

Maratha Reservation-सकल मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध
कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याबद्दल कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून आत्मक्लेश, निर्दशने, ठिय्या आंदोलन करून बुधवारी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आरक्षणाबाबत योग्य भूमिका सरकारने घ्यावी, अन्यथा तीव्र लढा देण्याचा इशारा या संघटनांनी यावेळी दिला आहे.
दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने सकाळी निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाने ४५ वर्षे केलेला संघर्ष राज्य सरकारने धुळीला मिळविला आहे. त्यामुळे आता सियासत अगर जंग चाहती हे तो जंग ही सही या भूमिकेत मराठा समाज राहणार आहे. त्याची सुरूवात कोल्हापूरमधून होईल, असे समन्वयक सचिन तोडकर आणि दिलीप पाटील यांनी सांगितले.
यावेळी स्वप्नील पार्टे रुपेश पाटील, भास्कर पाटील, रवी जाधव, सामर्जीत तोडकर, शैलेश जाधव, उमेश साळोखे उपस्थित होते. शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बुधवारी शांततेने ठिय्या आंदोलन करून आरक्षण रद्दबाबत निषेध नोंदविला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी योग्य भूमिका जर या सरकारने घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शौर्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी दिला. यावेळी प्रकाश सरनाईक, महादेव आयरेकर, मनोहर सोरप, विक्रम पवार, राजेंद्र थोरावडे, नंदकुमार घोरपडे आदी उपस्थित होते.