कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी ४०० कोटींचे प्रस्ताव तयार, पालकमंत्री आबिटकर यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:58 IST2025-11-01T11:57:59+5:302025-11-01T11:58:28+5:30
८८ रस्त्यांच्या कामांचा समावेश

कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी ४०० कोटींचे प्रस्ताव तयार, पालकमंत्री आबिटकर यांची माहिती
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील नवीन रस्ते करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांना दिली. हा निधी मित्रा व जागतिक बँकेकडून मिळविला जाणार असून सहा ते सात महिन्यांत या प्रस्तावाला मंजुरी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्ते, बाह्यवळण रस्ते, पाणी पुरवठ्यातील सुधारणा, कचरा उठाव आणि त्याची निर्गत, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था आदी महत्त्वाच्या विषयावर शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आबिटकर यांनी महापालिका, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह पालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
आयआरबीने केलेले रस्ते दुरुस्तीसह लिंकरोड तसेच अन्य महत्त्वाचे असे एकूण ८८ रस्ते पुढील वर्षभरात केले जाणार आहेत. त्यासाठी २५० कोटी आणि १५० कोटींचे असे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. आम्ही कोल्हापूर शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रयत्न करत असून गेल्या अनेक वर्षांत जे प्रश्न सुटले नाहीत ते आम्ही सोडविण्यात पुढाकार घेतला आहे. त्याला थोडा वेळ लागेल, पण ते सोडविल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे आबिटकर यांनी सांगितले.
पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी ३० कोटी रुपयांचे निधी आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये पुईखडी येथे ३० मेगावॅटचा सोलर प्लँट सुरू करणे, शिंगणापूर पंपिंग स्टेशनचे आधुनिकीकरण करणे अशा कामांचा समावेश असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
शहर अभियंता मस्कर यांना घरी घालवा
बैठकीत डांबरी प्लँट सुरू करण्याचे आदेश दिले होते, तो सुरू न झाल्यामुळे पालकमंत्री संतप्त झाले. हा प्लँट कधी सुरू होईल, त्याला किती खर्च येईल, अशी विचारणा त्यांनी शहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे केली. त्यावेळी यासाठी अडीच कोटी रुपये खर्च येईल आणि तो सुरू करण्यास दोन अडीच महिने लागतील, असे सांगितले. त्यामुळे पालकमंत्री अधिक संतप्त झाले. शहर अभियंता हे नकारात्मक भूमिकेतून काम करत आहेत. यांना या पदावरून मुक्त करून थेट घरी घालवा, असे आबिटकर यांनी प्रशासकांना सांगितले. रस्ते करण्यास वेळ लागणार असल्याने महापालिकेचा डांबरी प्लँट आठ दिवसांत सुरू करावा, अशा सक्त सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
सीएसआर फंडातून पाच कोटी
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी महाडिक उद्योग समूहातर्फे सीएसआर फंडातून पाच कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार अमल महाडिक यांनी बैठकीत केली.
पालकमंत्री आबिटकर यांनी दिलेल्या सूचना
- खुल्या जागा ताब्यात घेऊन महापालिकेचे नाव लावण्याची गती वाढवा
- ४० हजार मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी ड्रेन सर्वेक्षण करणार
- आठ दिवसात पार्किंगच्या जागा ताब्यात घेऊन तेथे पार्किंग सुविधा द्या
- कचरा उठाव, निर्गतीचा प्रश्न आठ दिवसांत सोडवा