Kolhapur: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर दानेवाडीसोबत कुशिरे, केर्ली गावाजवळ उड्डाणपुलाचा प्रस्ताव
By संदीप आडनाईक | Updated: January 8, 2025 15:19 IST2025-01-08T15:19:22+5:302025-01-08T15:19:41+5:30
आंदोलनाच्या रेट्याला यश : महामार्ग प्राधिकरणाकडून हलली सुत्रे

Kolhapur: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर दानेवाडीसोबत कुशिरे, केर्ली गावाजवळ उड्डाणपुलाचा प्रस्ताव
संदीप आडनाईक
कोल्हापूर : नियोजित नागपूर-रत्नागिरी १६६ या महामार्गावर पन्हाळा तालुक्यातील कुशिरे आणि करवीर तालुक्यातील निगवे दुमाला या गावांच्या हद्दीत प्रमुख जिल्हा मार्ग १२ वर क्रॉसरोडवर उड्डाणपूल बांधावा, या मागणीसाठी निगवे-कुशिरे उड्डाणपूल कृती समितीने रविवारी कुशिरे महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी जनआंदोलन केल्यानंतर याठिकाणी, तसेच केर्ली रोडवरही उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील लोकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीविरोधात निदर्शने केल्यानंतर अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. तसेच बोरपाडळे गावाजवळ दानेवाडी येथेही उड्डाणपुलाचा प्रस्ताव आहे.
दरम्यान, आंदोलनानंतर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाचे उपअभियंता गोविंद बैरवा यांच्याशी चर्चा केली. या मार्गावर उड्डाणपूल करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
जोतिबा यात्रेकरूंसाठी केर्लीजवळही उड्डाणपूल
दरम्यान, रत्नागिरी ते नागपूर एक्सप्रेस महामार्ग क्रमांक १६६ केर्ली ते वाडी रत्नागिरी, म्हणजेच श्रीक्षेत्र जोतिबा रस्त्यामधून जाणार आहे. कोल्हापूरहून येणाऱ्या भाविकांच्या गाड्या या केर्ली येथून श्री क्षेत्र जोतिबा डाेंगरावर दर्शनासाठी येत असल्यामुळे याठिकाणी वाहनांची सातत्याने मोठी वर्दळ असते. चैत्र यात्रा श्रावण षष्ठी यात्रा दर रविवारी, तसेच पौर्णिमादिवशी लाखो भाविक याच रस्त्याने येतात आणि जातात. त्यामुळे त्यांच्या जीवितालाही मोठा धोक पोहचणार आहे. त्यामुळे कोतमीरे मळ्याजवळ उड्डाणपुलाचा प्रस्ताव आहे.
विद्यार्थ्यांसाठीही सोयीचा
केर्ली, कुशिरे, रजपूतवाडी, सोनतळी, निगवे, केर्ले, पडवळवाडी, वडणगे, जोतिबा या परिसरातील हजारा विद्यार्थी या मार्गावरील शैक्षणिक संस्थेत शिकण्यासाठी येत असतात. शाळेपासून हा महामार्ग अवघ्या ५०० मीटरवर आह, त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे. पुलाची आवश्यकता असल्याचे या गावच्या ग्रामस्थांनी सांगितले.