पोलीस भरतीची प्रक्रिया त्वरित राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST2021-04-05T04:22:01+5:302021-04-05T04:22:01+5:30
शासनाने सन २०१९ साली जाहीर केलेल्या ५२०० पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया त्वरित राबवावी, अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील पोलीस भरतीचा ...

पोलीस भरतीची प्रक्रिया त्वरित राबवा
शासनाने सन २०१९ साली जाहीर केलेल्या ५२०० पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया त्वरित राबवावी, अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या बेरोजगार तरुणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बांबवडे येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन करणारे अल्लाबक्ष मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तरुणांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, शाहूवाडी तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. तालुक्याचा अपेक्षित असा औद्योगिक विकास न झाल्याने येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. परिणामी, येथील हजारो तरुण गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्नाची पराकष्ठा करत पोलीस भरतीचा सराव करत आहेत. शासनाने २०१९ मध्ये ५२०० पदांची पोलीस भरती करण्याचे जाहीर केले होते; परंतु अद्यापही या भरतीची प्रक्रिया राबवली गेली नसल्याने पोलीस भरतीच्या प्रयत्नात असलेल्या अनेक तरुणांची वयोमर्यादा संपत आली आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया त्वरित न राबविल्यास वयोमर्यादा ओलांडणाऱ्या तरुणांच्या आजपर्यंतच्या प्रयत्नावर पाणी फिरणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांच्या व्यथा लक्षात घेऊन शासनाने जाहीर केलेल्या ५२०० पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया त्वरित राबवावी व सन २०२०-२१ या वर्षातील पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगार तरुणांना दिलासा द्यावा, असेही या निवेदनात शेवटी म्हटले आहे. या निवेदनावर पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक तरुणांच्या सह्या आहेत.