प्रकल्पग्रस्तांनी केले जंगलातील दुर्मीळ झाडांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:35+5:302021-04-05T04:20:35+5:30
कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांनी रविवारी जंगलात असलेल्या प्रमुख व ...

प्रकल्पग्रस्तांनी केले जंगलातील दुर्मीळ झाडांचे पूजन
कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांनी रविवारी जंगलात असलेल्या प्रमुख व दुर्मीळ झाडांचे फोटोपूजन करून पर्यावरणविषयी बांधीलकी जपली.
यामध्ये हिरडा, उंबर, कुंभा व पिपरण या चार प्रमुख दुर्मीळ झाडांची फळे उपयोगी असून ती फळे जनावरे, जंगली प्राणी व पक्षी खातात. ही झाडे नैसर्गिकरीत्या जंगलामध्ये असून त्यांचा इतर कोणत्याही झाडावर अथवा जंगलावर वाईट परिणाम होत नाही.
निसर्गाचा ऱ्हास थांबवायचा असेल, पर्यावरण चांगले राखायचे असेल तर अशा अनेक प्रकारच्या नैसर्गिक, दुर्मीळ व जंगलात असलेल्या झाडांचे जतन केले पाहिजे. जंगलात नैसर्गिक असलेल्या या सर्व प्रकारच्या झाडांची लागवड करावी, नर्सरी करावी आणि जंगलात असलीच झाडे लावली जावीत. खरे म्हणजे जंगलातून बाहेर काढून जंगल संवर्धनाचे काम शक्यच नव्हते. आजही आम्ही असे म्हणत आहोत. आमच्या मूळच्या गावठाणामध्ये आमच्या वस्ती पुन्हा करावी. यातून जंगल संवर्धन चांगले होईल, असा आग्रह आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना करणार व तसे लेखी पत्र देणार, असे रविवारी आंदोलनात जनतेने व कार्यकर्त्यानी ठरविले.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, वसंत पाटील, प्रकाश बेलवलकर, शंकर पाटील, अशोक पाटील, विनोद बडदे, आकाराम झोरे व गावागावांतील प्रमुख कार्यकर्ते व आंदोलनकर्ते उपस्थित होते.
चौकट 01
आंदोलन सुरूच राहणार
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचा रविवारी पस्तिसावा दिवस होता. आता कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेले नियम पाळून व काळजी घेऊन संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.