प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीने मिळणार :उदय सामंत यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:32 IST2021-06-08T18:31:22+5:302021-06-08T18:32:52+5:30
Education Sector Uday Samant Kolhapur : प्राध्यापकांना राज्य सरकारकडून देय असलेल्या सातव्या वेतन आयोगातील ५० टक्के फरकाची रक्कम रोखीने दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली.

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटाच्या वतीने सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील व कोल्हापूर जिल्हा सुटाचे कार्यवाह डॉ. डी. आर. भोसले यांनी मंगळवारी कोल्हापुरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.
कोल्हापूर : प्राध्यापकांना राज्य सरकारकडून देय असलेल्या सातव्या वेतन आयोगातील ५० टक्के फरकाची रक्कम रोखीने दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांची शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटा च्या वतीने सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील व कोल्हापूर जिल्हा सुटाचे कार्यवाह डॉ. डी. आर. भोसले यांनी भेट घेतली व प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी फरकाची रक्कम रोखीनेच द्या अशी मागणी सुटाने केली. यावर मंत्री सामंत यांनी ही फरकाची रक्कम रोख देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्याची लवकरच अंमलबजावणी करु असे आश्वासीत केले.
प्राध्यापकांच्या रिक्त जागांच्या भरती बाबत सुटाने केलेल्या मागणीकडे लक्ष वेधताना शासनाने पन्नास टक्के जागा भरण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे सामंत यांनी सांगितले. नेट सेट चा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा अशी मागणी झाली, यावरही सामंत यांनी खुलासा करताना शासन याबाबतही सकारात्मक असून लवकरच त्याचेही चांगले परिणाम दिसतील असे सांगितले. प्राध्यापकांच्या स्थान निश्चिती बाबत तांत्रिक बाबींमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे होत असलेल्या नुकसात व्यक्तिशः लक्ष घालून ते प्रश्न निकालात काढावेत अशी मागणी केली.