रोज १० टन ऑक्सिजनची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:04+5:302021-05-05T04:40:04+5:30

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून रुग्णांंवरील उपचारासाठी माेठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. सध्या जिल्ह्यात रोजची गरज भागेल ...

Production of 10 tons of oxygen per day | रोज १० टन ऑक्सिजनची निर्मिती

रोज १० टन ऑक्सिजनची निर्मिती

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून रुग्णांंवरील उपचारासाठी माेठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. सध्या जिल्ह्यात रोजची गरज भागेल इतपतच अगदी काठावर ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा व गरज भागावी यासाठी जिल्हा प्रशासनच सध्या ऑक्सिजनवर आहे. पुढील काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई व पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सध्या गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती केली जात असून हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. येथे सध्या ६० बेडसाठी पुरेल इतक्या ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. या रुग्णालयासह कोडोली व गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर तसेच राधानगरीतील ग्रामीण रुग्णालय, इचलकरंजीतील आयजीएम व सीपीआर या सात रुग्णालयांमध्ये हे ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्यात येणार आहेत. या सगळ्या रुग्णालयांच्या ऑक्सिजन बेडच्या क्षमतेपेक्षा दुप्पट बेडना पुरतील इतक्या ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून जलसंपदा विभागातील यांत्रिकी मंडळाचे अधीक्षक अभियंता व्ही. ए. गायकवाड, कार्यकारी अभियंता सु. म. बागेवाडी, उपअभियंता पी. बी. कुंभार, सचिन लाड हे अधिकारी या प्रकल्पासाठी काम करत आहेत. याशिवाय भविष्यात उर्वरित पाच तालुक्यांतील रुग्णालयांमध्येही हे प्लँट बसविण्याचा विचार आहे.

---

रुग्णालयाचे नाव : प्लॅन्टची क्षमता (जंबो सिलिंडरची संख्या )

सीपीआर, कोल्हापूर : ३००

आयजीएम, इचलकरंजी : २००

उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज : १५०

उपजिल्हा रुग्णालय, कोडोली : १००

उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी : १००

ग्रामीण रुग्णालय, मलकापूर : १००

ग्रामीण रुग्णालय, राधानगरी : १००

--

६ कोटींचा प्रकल्प

सध्या जिल्ह्याला रोज ३४ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज आहे. जी सध्या अगदी काठावर भागवली जात आहे. सात ठिकाणी होणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती प्लँटमुळे १० मेट्रीक टनाची गरज पूर्ण होणार आहे. यासाठी ६ कोटींचा निधी लागणार असून महावितरण व सार्वजनिक बांधकामकडील कामांचा खर्च वेगळा असणार आहे.

-

स्वयंचलित यंत्रणा...

या प्रकल्पात हवेतून ऑक्सिजन शोषले जाणार आहे. यातील नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्साईड पुन्हा हवेत सोडून वैद्यकीय कारणासाठीचे शुद्ध ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरले जाईल. ही यंत्रणा पूर्णत: स्वयंचलित असणार असून बॅकअप व विद्युत जनरेटरदेखील बसविण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती अखंड सुरू राहील.

व्ही. ए. गायकवाड (अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ)

Web Title: Production of 10 tons of oxygen per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.