लॉकडाऊनमुळे ‘केएमटी’समोर अडचणींत : महिनाभर वर्कशॉपमध्ये बस धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:10 IST2020-04-14T17:09:19+5:302020-04-14T17:10:30+5:30
कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्यामुळे केएमटी आर्थिक अडचणीत आहे. सर्व बसेस वर्कशॉपमध्ये गेल्या महिन्यापासून धूळ खात थांबून आहेत. वापरच नसल्यामुळे सुटे भाग खराब होण्याची शक्यता आहे. यामध्ये वर्कशॉपमध्ये बॅटरी, टायर खराब होण्याचा सर्वाधिक धोका आहे.

ओळी-गेल्या महिन्यापासून कोल्हापुरातील बुद्धगार्डन येथील वर्कशॉपमध्ये केएमटी बस थांबून आहेत.
विनोद सावंत / लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॉकडाऊन, संचारबंदीमुळे केएमटीसमोर अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यापासून बस वर्कशॉपमध्ये धूळ खात उभ्या आहेत. वापर नसल्यामुळे बॅटरी, टायर खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवीन बसेसही नादुरुस्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केले आहे. याचा सर्व घटकांना फटका बसला आहे. यातून ‘केएमटी’ही सुटलेली नाही. गेल्या महिन्यापासून बससेवा बंद आहे. कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्यामुळे केएमटी आर्थिक अडचणीत आहे. सर्व बसेस वर्कशॉपमध्ये गेल्या महिन्यापासून धूळ खात थांबून आहेत. वापरच नसल्यामुळे सुटे भाग खराब होण्याची शक्यता आहे. यामध्ये
वर्कशॉपमध्ये बॅटरी, टायर खराब होण्याचा सर्वाधिक धोका आहे.
थांबून असणाऱ्या बसेस - १२९
नवीन बसेस- ७५
नादुरुस्त बसेस - १३
रोज मार्गस्थ असणा-या बसेस - १००
- लॉकडाऊननंतर सार्वजानिक वाहतूक सेवा सुरू होतील याची शाश्वती नाही. परिणामी एकाच ठिकाणी किमान दीड ते दोन महिने बस थांबून राहणार अशी स्थिती आहे. त्यामुळे डिझेल खर्च कमी होणार असला तरी हवा नसल्याने टायर तसेच बॅटरी खराब होण्याची शक्यता आहे. याचबरोबर इंजिन, वायरिंंगची देखभाल करावी लागणार आहे. त्यामुळे वर्कशॉप विभागाची जबाबदारी वाढली आहे.
- अशोक लेलँड कंपनीच्या ७५ नवीन बसेस असून ६५ बसेस सुस्थित आहेत. या बसेस अद्ययावत तंत्रज्ञानाच्या असून सेन्सरवर त्यांचे कामकाज चालते. यामध्ये काही मोठा बिघाड झाल्यास परराज्यांतून टेक्निशियन आणावे लागतात. त्यामुळे बंददरम्यान, नवीन बसेसची विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा लॉकडाऊन उठविल्यानंतर सर्व बसेस मार्गस्थ होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
बॅटरी खराब होऊ नये यासाठी दोन दिवसांतून बसेस एकदा तासभर बस सुरू करून ठेवल्या जात आहेत. तसेच हवेचीही तपासणी केली जात आहे. वापराविना बसेस नादुरुस्त होणार नाहीत, याची योग्य ती दक्षता घेतली जात आहे.
- सुभाष देसाई, केएमटी व्यवस्थापक