खासगी सावकारी; दाम्पत्याला अटक
By Admin | Updated: May 31, 2014 01:15 IST2014-05-31T00:54:01+5:302014-05-31T01:15:43+5:30
संशयित मुलाचा शोध सुरू

खासगी सावकारी; दाम्पत्याला अटक
कोल्हापूर : दर महिना दहा टक्के व्याजदराप्रमाणे ५० हजार रुपये बेकायदेशीररीत्या देऊन व घरात घुसून मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून मुलीच्या आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी साळोखेनगर परिसरातील मोरे-मानेनगरमधील दाम्पत्याला जुना राजवाडा पोलिसांनी आज शुक्रवार रात्री उशिरा अटक केली. शोभा शिवाजी खेडकर व शिवाजी खेडकर (दोघे रा.घर नंबर २३, मोरे-मानेनगर) अशी दाम्पत्यांची नावे असून त्यांच्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला खेडकर यांचा मुलगा संशयित स्वप्निल शिवाजी खेडकर (रा.मोरे-मानेनगर) यांचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, वीटभट्टीवर काम करणार्या मोरे-मानेनगर येथील मनिषा सर्जेराव सुतार (वय ३८) यांनी संशयित शिवाजी खेडकर व त्यांची पत्नी शोभा यांच्याकडून २२ जून २०१३ ला ५० हजार रुपये दहा टक्के व्याजाने पैसे घेतले होते. यावेळी सर्जेराव सुतार यांच्याकडून नोटरी स्टॅम्पवर लिहून घेऊन त्यावर ५० हजार ऐवजी ६० हजार रुपये दिले असल्याचा उल्लेख खेडकर यांनी लिहून घेतला. खेडकर दाम्पत्याने २२ मे २०१४ अखेरपर्यंत दर महिना दहा टक्के व्याजदराप्रमाणे ६० हजार रुपये बेकायदेशीरपणे सुतार यांच्याकडून वसूल केले. तरीही संशयितांनी मुद्दल व व्याज असे ५० हजार रुपये येणे बाकी आहेत, असे सांगून त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला. दरम्यान,आज शुक्रवार सकाळी संशयित सुतार यांच्या घरात गेले. यावेळी संशयितांनी सुतार यांच्या मुलीबरोबर पैसे दिले नाही तर, उचलून पळवून नेऊन धंद्याला लावून पैसे वसूल करू, असे लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर सुतार दाम्पत्याला मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर मनिषा सुतार यांनी संशयितांविरोधात पोलिसात फिर्याद दिली.