एलबीटी वसुलीसाठी दुकानावर छापा
By Admin | Updated: February 20, 2015 23:09 IST2015-02-20T22:54:04+5:302015-02-20T23:09:29+5:30
व्यापाऱ्यांचा विरोध : सांगली महापालिकेची पहिलीच कारवाई

एलबीटी वसुलीसाठी दुकानावर छापा
सांगली : महापालिकेने आज (शुक्रवार) थकित स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) वसुलीसाठी पहिल्यांदाच गणपती पेठेतील दुर्गा प्लॅस्टिक हाऊसवर छापा टाकून कागदपत्रे, स्टॉक नोंदवही, कच्ची बिले ताब्यात घेतली. कारवाईची कुणकुण लागताच एलबीटीविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी व्यापार बंद पाडून कारवाईला विरोध केला. व्यापाऱ्यांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. विरोधाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे महापौर विवेक कांबळे व आयुक्त अजिज कारचे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे व्यापारी विरुद्ध महापालिका असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. गेल्या दोन वर्षांपासून व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास नकार देत असहकार आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली असून व्यापाऱ्यांकडे १७० कोटीची एलबीटी थकित असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात महापौर कांबळे यांनी एलबीटी वसुलीसाठी फौजदारी, जप्तीची कारवाई सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आज दुपारी पालिका उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर व पथकाने ‘दुर्गा’ दुकानावर छापा टाकला.