गवसे येथे ४ कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:07+5:302021-04-14T04:21:07+5:30
आजरा : गवसे (ता. आजरा) येथील गायरान गटनंबर ५० मधील तीन एकरांमध्ये ४ कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले ...

गवसे येथे ४ कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार
आजरा : गवसे (ता. आजरा) येथील गायरान गटनंबर ५० मधील तीन एकरांमध्ये ४ कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे. गेली अनेक वर्षे जागेवरच असणारा प्रश्न संपुष्टात आला असून, आरोग्य केंद्राच्या इमारत उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे. आजरा-आंबाली मार्गावरील साखर कारखान्याजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे. आरोग्य केंद्रामुळे या विभागातील १७ गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गस्थ लागणार आहे.
आजऱ्याच्या पश्चिम भागात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात आरोग्य सेवा मिळविण्यासाठी नागरिकांना मोठ्या मरणयातना सहन कराव्या लागतात. आजारी रुग्णांना ऊन, वारा, पाऊस सोसत १८ ते २० किलोमीटर अंतर पार करून दवाखान्यासाठी यावे लागते.
दहा वर्षांपूर्वी तालुक्यातील गवसे व पेरणोली याठिकाणी आयुर्वेदिक दवाखाने मंजूर झाले. मात्र, सुरुवातीपासूनच या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे कागदोपत्री असणाऱ्या गवसेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला इमारतीमुळे आता मूर्तरूप येणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गायरानमधील जागा मिळण्यात अडचणी होत्या. अखेर ग्रामपंचायतीने गटनंबर ५० मधील ३ एकर जागा देण्याचा ठराव केला.
त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. या जागेवर सुसज्ज दवाखान्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारले जाणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी आजरा-आंबोली मार्गावरून १२ मीटर रुंद व ८०० मीटर लांबीचा रस्ता मंजूर झाला आहे. त्यामुळे दवाखान्याकडे जाण्यासाठीचा प्रश्नही संपुष्टात आला आहे. गवसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार असल्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होऊन त्यांना आधार मिळणार आहे.
गवसे प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ गवसे, किटवडे, घाटकरवाडी, सुळेरान, आंबाडे, शेळप, पारपोली, गावठाण, देवर्डे, दाभिल, दाभिलवाडी, देवकांडगाव, विनायकवाडी, दर्डेवाडी, वेळवट्टी, हाळोली, किटवडेपैकी धनगरवाडा या गावांना लाभ होणार आहे.