कोपार्डे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकसंधपणे लढणार असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच होईल. केडीसीसी व गोकुळबाबत चंद्रदीप नरके तुम्ही काळजी करु नका, सहकारात आम्ही राजकारण आणत नाही, त्यामुळे सहकारात ही तुम्ही आमच्यासोबतच असणार, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.बालिंगे (ता. करवीर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर अध्यक्षस्थानी होते. विधानसभेला चंद्रदीप नरके यांच्या मागे राष्ट्रवादी खंबीर उभी राहिल्यानेच त्यांचा विजयी सोपा झाला, आता जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी आम्हाला सोबत घ्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी केले. यावर, आमदार नरके म्हणाले, माझ्या विजयासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनापासून राबले. पण, तुमच्यासोबत राहण्यास तयार आहे, पण हसन मुश्रीफ मला सोबत घेणार आहेत का? मला सोबत घेतल्यानंतर तोटा होणार नाही, असा चिमटा ही त्यांनी काढला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत करवीरचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ताकदीने नरके यांच्या मागे राहिला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती म्हणून ताकदीने लढायचे आहेच, पण जिथे शक्य नाही त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी ठेवा. करवीरमध्ये जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढत असून त्यांच्या मागे हिमालय सारखा राहू.दरम्यान महेचे माजी सरपंच सर्जेराव जरग यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सरपंच राखी भवड, उपसरपंच पौर्णिमा जत्राटे यांच्यासह गुणवंतांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी, ‘गोकुळ’ चे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे, महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, अरविंद कारंडे, कृष्णात पुजारी, युवराज पाटील, रंगराव कोळी, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.
Kolhapur: आगामी निवडणुकीत महायुती म्हणून ताकदीने लढायचे, पण..; मंत्री हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:07 IST