Kolhapur: जोतिबा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात, भाविकांसाठी ४५ एसटी बसची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:32 IST2025-04-08T12:55:56+5:302025-04-08T13:32:43+5:30
पाणी रस्ते शौचालय घनकचरा याचे नेटके नियोजन

संग्रहित छाया
सतीश पाटील
कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, भाविकांसाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने पाणी, रस्ते, शौचालय, सीसीटीव्ही कॅमेरे, घनकचरा व्यवस्थापन, पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त याचे योग्य नियोजन केले आहे. केर्ली येथील कासारी नदीहून पाणी उपसा करून ते पाणी कुशिरे, गायमुख आणि ज्योतिबा डोंगर, असे चार टप्प्यांत आणले आहे. १०० लाख लिटर पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या आणि गावातील छोट्या १३ टाक्यांमधून या पाण्याचे नियोजन केले आहे.
रस्ता आणि सुरक्षा कठडे..
जोतिबाला येण्यासाठी गिरोलीपासून येमाई मंदिरापर्यंत चौपदरी मोठा रस्ता करण्यात आला आहे. भाविकांना रस्त्याचा अडथळा होऊ नये, वाहतूक व्यवस्थित व्हावी या उद्देशाने रस्ते चांगले केले आहेत, तसेच रस्त्याकडे असणारे सुरक्षा कठडे आणि लोखंडी ग्रीलसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने मारलेले आहेत.
पार्किंग व्यवस्था
देवस्थान समिती आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने जोतिबावर यमाई मंदिर, एसटी स्टँड येथे पार्किंगची सोय केली आहे.
शौचालय
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने १५० शौचालयाची सोय करण्यात आली आहे. हे शौचालय एसटी स्टँड, यमाई मंदिर, गायमुख, सेंट्रल प्लाझा आदी ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.
घनकचरा व्यवस्थापन
यात्रेच्या काळात येणाऱ्या भाविकांकडून घनकचरा होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने १३ ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून हा घनकचरा उचलण्याचे नियोजन केले आहे.
यात्रेसाठी ४५ एसटी बस
भाविकांना स्नानगृहासाठी कुपेश्वर तलाव येथे सोय करण्यात आली आहे, तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना दख्खनचा राजा जोतिबाचे सुलभ दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप येथे दर्शन करण्यात येणार आहे. भाविकांना लाइव्ह दर्शन होण्यासाठी दोन स्क्रीन सेंट्रल प्लाझा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे लावण्यात येणार आहेत. दर्शन रांगेत भाविकांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेसाठी ४५ एसटी बसची सुविधाही करण्यात येणार आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याचे, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त आदी कामे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहेत. -शिवाजीराव पाटील, ग्रामविकास अधिकारी, वाडी रत्नागिरी
चैत्र यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, भाविकांना लाइव्ह आणि सुलभ दर्शनाची सोय करण्यात आली आहे, तसेच पालखी मार्गातील अतिक्रमणही काढण्यात आले आहे. -धैर्यशील तिवले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अधिकारी