कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच मोबाइलमधील डेटा डिलिट केला, अशी धक्कादायक माहिती फिर्यादी सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी आज, सोमवारी (दि. १७) न्यायालयात दिली. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत संशयित आरोपी कोरटकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. उद्या, मंगळवारी अंतिम निर्णय होईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा जामीन अर्ज रद्द करावा, अशी भूमिका सरकारी वकील विवेक शुल्क आणि फिर्यादीचे वकील असिम सरोदे यांनी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात मांडली.कोरटकरच्या वकिलांनी जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती केली. ॲड. शुक्ल यांनी काही खटल्यांचे संदर्भ दिले. पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनीही न्यायालयात बाजू मांडत कोरटकर याच्या अटकेची गरज व्यक्त केली. यावेळी फिर्यादी इंद्रजीत सावंत यांच्यासह हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, आदी शिवप्रेमी उपस्थित होते. सुनावणीसाठी वकिलांनीही मोठी गर्दी केली होती.
ॲड. सरोदे यांचा गंभीर आरोपयुक्तीवाद करताना ॲड. सरोदे म्हणाले, 'कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे चारित्र्यहनन करून दोन समुदायात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याने सावंत यांना असभ्य भाषा वापरून शिव्या घातल्या. गुन्हे दाखल होताच त्याने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या सल्ल्याने पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाइलमधील डेटा डिलिट केला. याबाबतचे कलम गुन्ह्यात वाढवण्याची गरज आहे. सावंत यांना धमकावण्यापूर्वी त्याचे कोणाशी बोलणे झाले? काय बोलणे झाले? त्याचे कोणासोबत फोटो होते? याची माहिती मोबाइलमधून मिळाली असती. त्याच्या चौकशीसाठी अटक गरजेची आहे.