Praniti Shinde: “युपीतील उन्नावमध्ये भीती वाटली, कारण तिथे योगींचे सरकार आहे”: प्रणिती शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:20 IST2022-04-05T15:19:29+5:302022-04-05T15:20:38+5:30
Praniti Shinde: कोल्हापूरमधील पोटनिवडणूक बिनविरोध करून भाजपने माणुसकी दाखवायला हवी होती, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

Praniti Shinde: “युपीतील उन्नावमध्ये भीती वाटली, कारण तिथे योगींचे सरकार आहे”: प्रणिती शिंदे
कोल्हापूर: आताच्या घडीला कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची (Kolhapur Bypoll Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतील अनेक नेते प्रचारासाठी आले होते. यावेळी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे गेल्याचे सांगत, तिथे मला भीती वाटली. याचे कारण तिथे योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी जनसभेला संबोधित करताना केला.
महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार धीरज देशमुख, शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई, आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थित युवा मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रणिती शिंदेही हजर होत्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी त्या कोल्हापूरात आल्या होत्या.
कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करायला हवी होती
काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यावर माजी खासदार धनंजय महाडीक यांनी केलेल्या टीकेला प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर तिथे भाजपने माणुसकी दाखवायला हवी होती. तसेच कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करायला हवी होती, अशी अपेक्षा प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
युपीतील उन्नावमध्ये भीती वाटली, तिथे योगी सरकार आहे
परवा उत्तर प्रदेशात गेले होते. उन्नाव तुम्हाला नाव माहिती असेल. मला तिथे जाण्यास भीती वाटली. याचे कारण तिथे योगी सरकार आहे. महाराष्ट्रात आम्ही इकडे येतो. रात्री सभेला बसतो, ताट मानेने आम्ही सभेला येतो. तिथे असे नाही, तिथे उमेदवारालाही बोलता येत नाही. कारण तिथे जी घटना घडलेली तिच्या आईला उमेदवारीचे तिकीट दिले होते. त्यांच्या सभेला तीनशे पोलिस होते. तिथे सभेला सुरक्षेसाठी असे वातावरण आहे. एक मिनिटासाठी विचार करा जर संपूर्ण देशात असे घडले. तर या महाराष्ट्राचा तरुण मुलगा काय तोंड दाखवणार आहे. तुमच्या माय माऊलीचा आदर करणे तुमच्या हातात आहे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.