कोल्हापूरच्या प्रणवचा फ्रीस्टाईल फुटबॉलवर जागतिक विक्रम, यापूर्वी बांगलादेशच्या महमुदुलच्या नावावर होती नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 11:30 IST2023-02-28T11:30:22+5:302023-02-28T11:30:44+5:30
प्रणव गेल्या दोन वर्षांपासून हा विक्रम मोडण्याचा करत होता सराव

कोल्हापूरच्या प्रणवचा फ्रीस्टाईल फुटबॉलवर जागतिक विक्रम, यापूर्वी बांगलादेशच्या महमुदुलच्या नावावर होती नोंद
वडणगे : येथील प्रणव अशोक भोपळे याने फ्रीस्टाईल फुटबॉलवर आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली. त्याच्या नावावर हा तिसरा जागतिक विक्रम नोंदविला गेला असून, या नोंदीचे प्रमाणपत्र प्रणवला नुकतेच प्राप्त झाले. यापूर्वी बांगलादेशच्या महमुदुल हसन फैसल याच्या नावावर या जागतिक विक्रमाची नोंद होती. त्याने एका मिनिटामध्ये १३४ वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरविला होता. प्रणवने एका मिनिटामध्ये १४६ वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
या रेकॉर्डचे प्रात्यक्षिक त्याने २५ डिसेंबर २०२२ रोजी दिले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार अधिकृत साक्षीदार म्हणून क्रीडाशिक्षक रवींद्र पाटील यांनी, तसेच टाईमकिपर म्हणून वडणगे फुटबॉल क्लबचे कोच अशोक चौगले यांनी काम पाहिले.
प्रणव गेल्या दोन वर्षांपासून हा विक्रम मोडण्याचा सराव करत होता. त्यासोबतच करिअर म्हणून जोपासलेल्या फ्रिस्टाइल फुटबॉल या खेळाचा सराव व नवनवीन तंत्रे आत्मसात करीत आहे. त्याला आई प्रतिभा भोपळे, वडील अशोक भोपळे, मोठा भाऊ अजिंक्य भोपळे, मामा सुधीर चिकोडे, तसेच वडणगे फुटबॉल क्लबचे अध्यक्ष रविराज मोरे, प्रवीण जाधव, सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक रघुनाथ पाटील, रगेडियन जिमचे फिटनेस कोच विनायक सुतार, अभिजित पाटील, ऋषिकेश ठमके यांचे मार्गदर्शन लाभले.