कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर वीजपुरवठा तात्काळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 18:08 IST2021-11-29T18:06:58+5:302021-11-29T18:08:34+5:30
कृषी पंपाची बिले भरली नाहीत म्हणून पुर्ण डीपीचाच वीजपुरवठा खंडीत करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात आज, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करीत महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर वीजपुरवठा तात्काळ सुरू
कागल : येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून कृषी पंपाची बिले भरली नाहीत म्हणून पुर्ण डीपीचाच वीजपुरवठा खंडीत करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात आज, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करीत महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शेतकरीवर्ग आक्रमक झाल्याने डीपींचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करीत असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले.
दरम्यान चुकीची तसेच वाढीव आलेली बिले दुरूस्त करून देण्यात येतील. मोठ्या रक्कमेच्या बिलांना हप्ते करून देण्यात येईल. मात्र दोन ते तीन दिवसानंतर जर बील भरले नाही तर वैयक्तीक कनेक्शन बंद करण्यात येतील. असेही उप कार्यकारी अभियंता विक्रांत सपाटे यांनी स्पष्ट केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर, अविनाश मगदुम, प्रभु भोजे, सचिन घोरपडे, अशोक शिरोळे, बाळासाहेब पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या मनमानीपणाबद्दल तक्रारी मांडल्या. या आंदोलनात कागल, करनुर, वंदुर या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भाषणे केली. विज वितरण कंपनीचे विक्रांत सपाटे, तानाजी कोरवी, विणा मठकर यांना धारेवर धरले. अजय पोवार हे कार्यकर्त्यांचा रोष पाहून तेथून पसार झाले. पोलीस उपनिरिक्षक शशिकांत गच्चे यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी मध्यस्थी करीत आंदोलनात तोडगा काढला.