बिल थकल्याने वीज खंडित, उचगावमध्ये व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा झाला मृत्यू; भर पावसात नातेवाईकांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:34 IST2022-06-03T13:33:52+5:302022-06-03T13:34:29+5:30
नातेवाईकांनी महावितरणकडे वारंवार फोन करून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर व्हेंटिलेटर बंद पडून आमेश काळेचा मृत्यू झाला.

बिल थकल्याने वीज खंडित, उचगावमध्ये व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा झाला मृत्यू; भर पावसात नातेवाईकांचे आंदोलन
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शांतिनगर भागात घरी व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आमेश आप्पा काळे (वय ३८, रा. राजर्षी शाहू वसाहत, शांतिनगर, उचगाव) असे मृताचे नाव आहे.
दरम्यान, त्याच्या मृत्यूस महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी उचगावमधील ग्रामस्थांनी गुरुवारी भर पावसातही कोल्हापुरात ‘सीपीआर’मध्ये आंदोलन करून, मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. करवीर पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी आंदोलकांची भेट देऊन चौकशीचे आश्वासन दिल्याने सायंकाळी मृतदेह ताब्यात घेतला.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, आमेश काळे हे गेली दोन वर्षे फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. खासगी रुग्णालयात उपचारानंतर त्यांना उचगाव येथे घरीच व्हेंटिलेटर लावून उपचार सुरू होते. त्यांच्या घरगुती वीज कनेक्शनचे वीज बिल थकल्याने ते भरण्यासाठी महावितरणने तगादा लावला. बिल भरण्यासाठी दि. २ जूनपर्यंत मुदतीची मागणी त्यांच्या वडिलांनी केली. तरीही त्यांचा वीज पुरवठा दि. ३० मे रोजी खंडित केला. वडिलांनी शेजारील भावाच्या घरात आमेशला स्थलांतरित करून तेथे व्हेंटिलेटर लावला. पण गुरुवारी सकाळी ७ वाजता परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. आमेशच्या नातेवाईकांनी महावितरणकडे वारंवार फोन करून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर व्हेंटिलेटर बंद पडून आमेश काळेचा मृत्यू झाला.
मृत्यूस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची ग्रामस्थांनी मागणी केली, नातेवाईकांनी ‘सीपीआर’मध्ये शवविच्छेदनानंतर मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी करवीर पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांना निवेदन दिले.
या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तणावाचे वातावरण बनल्याने गांधीनगरचे सहा. पो. नि. विवेकानंद राळेभात, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव आदींसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही.
मुसळधार पावसातही आंदोलन
शवविच्छेदन गृहासमोर मोठ्या संख्येने आंदोलकांनी ठिय्या मारला. सायंकाळी मुसळधार पावसातही आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यामुळे आंदोलकांसह पोलीसही भिजून चिंब झाले होते.