कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सहा महिन्यांतच पडले खड्डे, खड्ड्याला पुष्पहार घालून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:18 IST2025-07-12T18:18:11+5:302025-07-12T18:18:25+5:30
कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सहा महिन्यांतच पडले खड्डे, खड्ड्याला पुष्पहार घालून निषेध
प्रकाश पाटील
कोपार्डे : कोल्हापूर ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाचे कळे (ता.पन्हाळा) येथे पर्यंत काम होऊन सहा महिने झाले, पण अवघ्या सहा महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, पण त्याची दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतली नाही, त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याचे खरे रूप लोकांसमोर आले आहेत.
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणून कोल्हापूर ते गगनबावडाकडे पाहिले जाते. या रस्त्याचे रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षे सुरू होती. त्यातून सुरुवातील १४ मीटरचा रस्ता मंजूर झाल्याचे लोकप्रतिनिधी सांगत होते. मात्र, प्रत्येक कामाला सुरुवात झाली आणि तो १० मीटरवर आला. रस्त्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे.
अद्यापही बालिंगे पुलाशेजारी अपुऱ्या कामामुळे कसरत करतच जावे लागते. जे काम पूर्ण झाले, त्या रस्त्याच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच तक्रारी होत्या. आंदोलने झाली, निवेदने दिली, पण कोणीच त्याची दखल घेतली नाहीत. पहिल्या पावसाळ्यातच रस्त्याच्या दर्जासमोर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.
खड्ड्याला पुष्पहार घालून निषेध
रस्त्याचे काम सुरू असताना अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, पण कोणीच दखल घेतली नाही. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. चिंचवडे (ता.करवीर) येथे तर एका तरुणाने खड्ड्याला पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त केला.
येथे पडलेत मोठे खड्डे..
- चिंचवडे येथे रस्त्याच्या मध्यभागीच खड्डा पडला आहे.
- नागदेववाडी फाटा ते बालिंगा चौकच्या दरम्यानचा रस्त्यावरील सरफेस पूर्णपणे उखडला आहे.
- कळे ते आसगाव दरम्याच्या ओढ्याचे काम निकृष्ट झाले आहे. येथे मोठमोठे खड्डे आहेत.
- कोपार्डे येथे रस्त्याला तडे गेले आहेत.
रस्त्याचे काम सुरू असतानाच अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांसह संबधित विभागास निकृष्ट काम निदर्शनास आणून दिले, तरीही त्याची दखल घेतली नाही. काम निकृष्ट दर्जाचे असून, त्यापेक्षा ग्रामपंचायतीच्या वतीने गल्लीबोळातील रस्ते दणदणीत आहेत. - मधुकर जांभळे (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)