राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सभेत महायुतीचा धर्म अध्यक्षांनी पाळला नसल्याचा आरोप शौमिका महाडिक यांनी केला. तर, महायुतीचा धर्म म्हणूनच त्यांना व्यासपीठावर सन्मानाने बोलावले होते, त्यांनी विरोधी भूमिका घेतल्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा दावा आहे. महायुतीचा धर्म कोणी धुडकावला, हा संशोधनाचा मुद्दा असला तरी ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये सभेच्या निमित्ताने मिठाचा खडा पडला असेच म्हणावे लागेल.राज्यातील महायुतीचा पॅटर्न ‘गोकुळ’ मध्ये राबवून आमदार सतेज पाटील यांना सत्तेपासून बाजूला करण्याची खेळी महायुतीतील नेत्यांनी खेळली. त्यातूनच कोणीही करा पण, महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे. असा आग्रह महाडीक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला होता. मुख्यमंत्र्यांचे आदेश जरी असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ-सतेज पाटील यांचा दोस्ताना तोडणे दोघांनाही कठीण होते. त्यातून नविद मुश्रीफ यांचा पर्याय पुढे करून सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांची गोची केली.
वाचा: मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..
गेली चार वर्षे ‘गोकुळ’च्या सभेत आक्रमक असलेल्या शौमिका महाडिक यांनी विविध प्रश्न उपस्थित करत सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेणार असे संकेत दिले होते. त्यातून महायुतीचा अध्यक्ष असल्याने महाडिक यांनी व्यासपीठावर यावे. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असे मंत्री मुश्रीफ यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. तरीही अहवालात स्थानिक भाजप नेत्यांचे फोटो नाहीत, यासह संचालक संख्या वाढीच्या पोटनियम दुरुस्तीवर बोट ठेवत सभेला व्यासपीठावर न येता सभासदांमध्ये बसण्याचा निर्णय महाडीक यांनी घेतला. येथेच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे ‘गोकुळ’च्या वर्तुळात चर्चा सुरू असून या सभेचा परिणाम ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीवर होणार हे निश्चित आहे.
वाचा: ‘गोकुळ’चे संचालक मंडळ आता २५ सदस्यांचे, सभेत पोटनियम दुरुस्तीस मंजुरी
मुश्रीफ-सतेज पाटील गट्टी घट्ट‘गोकुळ’ची आगामी निवडणूक महायुती म्हणून लढणार हे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक वेळा सांगितले असले तरी त्यांची आमदार सतेज पाटील यांच्या सोबतची मैत्री घट्टच आहे. हीच गट्टी महाडिक यांच्या दृष्टीने संभ्रम निर्माण करणारी आहे.मुश्रीफ-महाडिक संबंध ताणणार?सभेत शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर यावे, अशी मुश्रीफ गटाची अपेक्षा होती. पण, त्यांनी सभासदांमध्ये बसून प्रश्न उपस्थित केल्याने मंत्री मुश्रीफ हे काहीसे नाराज आहेत. यामुळे आगामी काळात मुश्रीफ-महाडिक यांचे सबंध ताणण्याची शक्यता आहे.
महायुतीचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाणार?‘गोकुळ’च्या सभेवरून महायुतीमधील संबंध ताणणार हे निश्चित झाले आहे. पोटनियम दुरुस्ती सभेत झाली असली तरी शासनाच्या पातळीवर मंजुरी घ्यावी लागते. येथे मंत्री मुश्रीफ हे मंजुरीसाठी तर महाडिक ते नामंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जाणार हे निश्चित आहे.