टोलसंदर्भात १७ ला सुनावणीची शक्यता
By Admin | Updated: July 13, 2014 00:47 IST2014-07-13T00:44:50+5:302014-07-13T00:47:25+5:30
उच्च न्यायालय : वकील नरवणकरांची माहिती

टोलसंदर्भात १७ ला सुनावणीची शक्यता
कोल्हापूर : शहरातील वादाचा आणि संघर्षाचा विषय बनून गेलेल्या टोलसंदर्भात येत्या १७ जुलैला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे वकील युवराज नरवणकर यांनी न्यायालयात अर्ज करून तशी विनंती केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने टोल संदर्भात ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाला दिले आहेत. तथापि, याबाबत अद्याप उच्च न्यायालयाने सुनावणी किंवा अंतिम निर्णयाची तारीख निश्चित केलेली नाही. कृती समितीचे वकील युवराज नरवणकर यांनी १० जूनला एका अर्जाद्वारे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तारीख निश्चित करावी म्हणून विनंती अर्ज दाखल केला आहे. १७ जुलैला सुनावणी होणार की नाही, हे सोमवारी कळणार असल्याचे सांगण्यात आले.
टोल विरोधात तीन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिका आता अंतिम निर्णयावर आहेत. रस्ते विकास महामंडळाने आयआरबी कंपनीशी केलेला करार हाच मुळात बेकायदेशीर आहे. रस्त्यांच्या कामात फसवणूक झाली आहे. कराराप्रमाणे रस्त्यांची कामे झालेली नाहीत, असा आक्षेप कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेद्वारे घेतला आहे.
महानगरपालिका, राज्य सरकारने रस्त्यांचा खर्च भागवावा; पण कोल्हापूरकरांची टोलमधून मुक्तता करावी,अशी मागणी टोलविरोधी कृ ती समितीची आहे. त्यामुळे न्यायालयात निर्णय काय व्हायचा तो होऊ दे, पण आम्ही तो रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे कृती समितीचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)