कुरुंदवाड-नृसिंहवाडी यादव पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:35+5:302021-06-09T04:30:35+5:30
रमेश सुतार बुबनाळ : कुरुंदवाड-नृसिंहवाडी दरम्यान असलेल्या पंचगंगा नदीवरील दलितमित्र दिनकरराव यादव पुलाची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची अक्षरश: चाळण ...

कुरुंदवाड-नृसिंहवाडी यादव पुलाची दुरवस्था
रमेश सुतार
बुबनाळ : कुरुंदवाड-नृसिंहवाडी दरम्यान असलेल्या पंचगंगा नदीवरील दलितमित्र दिनकरराव यादव पुलाची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलादरम्यान वारंवार अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत त्वरित लक्ष देऊन पुलावरील रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
नृसिंहवाडी, कुरुंदवाडबरोबर कर्नाटकातील गणेशवाडी, कागवाडपर्यंत ते शिवनाकवाडी बोरगांवपर्यंत जवळचा जोडणारा मार्ग हा कुरुंदवाड-नृसिंहवाडी यादव पुलावरून असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक होत असते. राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असलेतरी या पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. लोखंडी अँगल तुटल्याने वारंवार अपघात होत आहेत. रस्त्यात खड्डे की खड्डयांत रस्ता असा काहीसा अनुभव प्रवाशांना येत आहे. पुलालगत संरक्षक कठडे नसल्याने वाहने पंचगंगा नदीपात्रात कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकवर्षी पुलाची रंगरंगोटी करण्यात येते. मात्र, दुरुस्तीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.
-----------------------
कोट - सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करुन पुलालगत संरक्षक कठडे तातडीने बांधावेत. अन्यथा कुरुंदवाड-नृसिंहवाडी रिक्षा युनियनच्यावतीने तीव्र आंदोलन करू.
- सुभाष रुकडे, रिक्षा युनियन संघटना अध्यक्ष
फोटो - ०८०६२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कुरुंदवाड-नृसिंहवाडी मार्गावरील यादव पुलालगत संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.