पन्हाळा-शाहूवाडीत श्रेयवादाचे राजकारण : विकासकामांचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:28 IST2018-09-07T00:15:28+5:302018-09-07T00:28:16+5:30

पन्हाळा-शाहूवाडीत श्रेयवादाचे राजकारण : विकासकामांचा बोलबाला
नितीन भगवान ।
पन्हाळा : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या कोणतेही वारे वाहत असले तरी शाहूवाडी-पन्हाळ्याच्या राजकारणात सध्या विकासाचाच बोलबाला आहे. या दोन्ही तालुक्यांत अनेक विकास योजना कार्यान्वित झाल्या आहेत. याबाबत सध्यातरी सगळ्यांचेच एकमत आहे, पण ही कामं नेमकी कुणामुळे आलीत याबाबत टोकाचे मतभेद आहेत.
या दोन्ही तालुक्यांत अजूनही रस्ते, पाणी, वीज यांच्याच समस्या प्रतीवर्षी भेडसावत आहेत. मी हा रस्ता केला. तेथे पाणी योजना आणली. त्या ठिकाणी वीज जोडली, हे आजी-माजी लोकप्रतिनिधी भाषणबाजी करताना सांगत आहेत, पण बहुतेक लोकांचे म्हणणे या तर मूलभूत गरजाच आहेत. मग हा विकास म्हणू शकतोे.
शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी रस्त्यांची अनेक कामे आपण मंजूर करून आणल्याचे सांगून संबंधित गावात त्या कामांची मंजुरीची पत्रे सुपूर्द करण्याचा कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. शिवसेना राज्यात सत्तेत असून नसल्यासारखी आहे. कारण भाजपप्रणीत देवेंद्र फडणवीस सरकारला अपशकुन करण्याची एकही संधी शिवसेनेने गेल्या चार वर्षांत सोडलेली नाही. केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपप्रणीत सरकारला कुचकामी ठरवण्याची शिवसेनेला विरोधी पक्षांपेक्षा अधिक घाई झाली आहे. युतीतला भागीदार पक्ष म्हणून चांगल्या कामांचे श्रेय घेण्याचा पूर्ण अधिकार शिवसेनेला आहे, पण सरकारविरोधात ज्या मुद्द्यांवर लोकांमध्ये नाराजी आहे, त्याची जबाबदारी मात्र शिवसेनेला घ्यायची नाही. किंबहुना हे सरकार कसे अपयशी आहे, हे सांगण्यास शिवसेना विरोधकांच्या नेहमीच दोन पावले पुढे असते. त्यामुळे या सरकारने काम केलेय का नाही, ते एकदा शिवसेनेला ठरवावे लागणार आहे.
दुसऱ्या बाजूला राज्यातल्या भाजपप्रणीत आघाडी सरकारशी जवळीक असलेले माजी मंत्री विनय कोरे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गटातूनही ही कामे सरकारच्या माध्यमातून केली आहेत, असे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या संबंधातल्या पोस्ट त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड होत आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर याबाबत समर्थकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. चौकाचौकांत सुरू असलेल्या डिजिटल बोर्डसमुळे जनता हैराण झाली आहे. त्यात वर्तमानपत्रात परस्परविरोधी बातम्या छापून येत असल्याने लोकांना काही कळेनासे झाले आहे. आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
आगामी निवडणुकात भाजप आणि शिवसेनेची युती होण्याच्या शक्यतेबाबत एकमत होणे कठीणही नाही आणि सोपे पण नाही. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये सहभागी असलेलेच पक्ष एकमेकांसमोर असतील आणि जी काही विकासकामे झालीत किंवा मंजूर झालीत, ती आपल्यामुळेच झालीत, असे दावे दोन्ही पक्षांकडून होतील. त्यामुळे कामे नेमकी कुणी केलीत, याचा निर्णय जनतेला मतपेटीतून द्यावा लागणार आहे, पण सध्यातरी श्रेयवादाची स्पर्धा एवढी पराकोटीला गेली आहे की, एकाच विकासकामांची दोन दोन उद्घाटने झाली नाहीत म्हणजे मिळविली, अशी स्थिती शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यांत आहे.
‘ये पब्लिक हैं, सब जानती हैं’
सोशल मीडियाच्या आगमनानंतर लोकांत पण आता जनजागृती जोरदार होऊ लागली आहे. गटातटाचे राजकारण एका बाजूला सुरू असले तरी लोकांना आता दर्जेदार कामे पाहिजे आहेत. निवडणुकीच्या राजकारणाचं अर्थकारण सांभाळताना विकासकामात पूर्वांपार चालत आलेल्या खाबूगिरीला आता चाप लावावा लागणार आहे. कामाचा दर्जा घसरला तर त्याचा जाब जनता निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. विकासाचा सूर्य कुणामुळे का उगवला असेना, आता विकासकामावर होणाºया कोट्यवधीच्या खर्चातून जास्तीत जास्त दर्जेदार कामे झाली तरच खºया अर्थाने शाहूवाडी-पन्हाळ्यात विकासाचा सूर्य उगवला असे म्हणता येईल, अन्यथा ‘ये पब्लिक हंै, सब जानती हंै’, हे सर्वच राजकारणी मंडळींनी लक्षात घेतलेले बरे.