कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : सोयीचे तिथे 'पक्ष', गैरसोयीचे तिथे 'गट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 11:44 AM2021-12-18T11:44:25+5:302021-12-18T11:47:10+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारामधील राजकारण वेगाने बदलत आहे. या सर्व चित्रामध्ये भाजप कुठेच दिसत नाही. जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा विनय कोरे आणि प्रकाश आवाडे करत आहेत.

The politics of co operation in Kolhapur district is changing | कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : सोयीचे तिथे 'पक्ष', गैरसोयीचे तिथे 'गट'

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : सोयीचे तिथे 'पक्ष', गैरसोयीचे तिथे 'गट'

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहकारामधील राजकारण वेगाने बदलत असून, जिथे सोयीचे तिथे पक्ष, गैरसोयीचे असेल तिथे गट आणि अगदीच काही झाले नाही, तर मग वैयक्तिक ताकद, याच्याआधारे ते खेळले जात असल्याचे दिसून येत आहे. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नको, असे एकीकडे काहीजण म्हणत असताना, दुसरीकडे त्याच्याआधारेच जागाही मागितल्या जात आहेत.

यातूनच मग शिवसेनेचे राज्यमंत्री ,  हे एकीकडे कोल्हापुरात राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, तर दुसरीकडे तासाभरात तिकडे हातकणंगले तालुक्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशेजारी बसून वडगाव बाजार समितीची चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे. हा विरोधाभास आता जिल्हावासीयांनाही सवयीचा झाला आहे.

सध्या जिल्हा बँकेच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ शक्यतो तडजोडीतून ताकदवान नेते आपल्यासोबत राहतील याची काळजी घेत आहेत. परंतु शिवसेना, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, भाजप, आबिटकर, नरके, कुपेकर गट अशांच्या मागण्या पूर्ण करता करता राष्ट्रवादीच्याच वाट्याला किती जागा राहणार, याचा हिशेब करण्याची वेळ मुश्रीफांवर आली आहे. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेला ‘दोनच’ जागा, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

भाजप चित्रात कुठेच नाही

या सर्व चित्रामध्ये भाजप कुठेच दिसत नाही. जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा विनय कोरे आणि प्रकाश आवाडे करत आहेत. त्यामुळे भाजपला खरोखरच या निवडणुकीत रस आहे की नाही, हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शनिवारी कोल्हापुरात येणार आहेत, त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

सातारा, सांगलीचा संदर्भ

सातारा जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल लागले. तसेच सांगली जिल्हा बँकेत भाजपचे चार उमेदवार निवडून आले. त्यामुळे कोल्हापुरातही येतील त्यांना सोबत घेऊन जेवढे शक्य होईल तेवढे भक्कम पॅनेल करण्याची भाजपमधील एका गटाची इच्छा आहे. परंतु चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवरच सर्व काही अवलंबून आहे.

Web Title: The politics of co operation in Kolhapur district is changing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.