उपद्रवग्रस्त टस्कर न्या.., मठाचा हत्ती वनतारात कशाला नेता - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:57 IST2025-07-22T16:56:10+5:302025-07-22T16:57:09+5:30
शेतकऱ्यांचे नुकसान करणारे हत्ती पकडून घेऊन जावा

संग्रहित छाया
कोल्हापूर : नांदणी, करवीर, तेरदाळ येथील स्वस्तिश्री जनिसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाचा हत्ती गुजरातच्या वनतारा या ठिकाणी घेऊन जाण्याचे नियोजन सरकार करीत आहे. तुम्हाला हत्तीच न्यायचे असतील तर शेतकऱ्यांचे नुकसान करणारे हत्ती पकडून घेऊन जावा, पण जैन मठामधील हत्ती नेऊ नका, अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केली.
नांदणी येथील मठाने हा हत्ती येथून हलवू नये यासाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली.
सतेज पाटील म्हणाले, जैन मठातील हत्तींची निगा कशी राखावी याबाबत सरकारने नियमावली तयार करावी. हा हत्ती नेण्यामुळे धार्मिक भावना दुखाविण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा. दोनशे वर्षांची परंपरा सरकार मोडणार आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कोणतीही कार्यवाही होऊ नये यासाठी प्रयत्न करा : मठाची मागणी
जैन मठातील माधुरी हत्ती जामनगरला हस्तांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नांदणी, करवीर, तेरदाळ येथील स्वस्तिश्री जनिसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ अतिशय प्राचीन धर्मपीठ आहे. हत्ती घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू झाल्याने सामाजिक व धार्मिक असंतोष निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल रिटपिटिशन आदेश होईपर्यंत हत्ती स्थलांतराबाबत कोणतीही कार्यवाही होऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मठाने आमदार सतेज पाटील यांच्याकडे केली.