(नियोजन विषय) कोल्हापूर शहरातील ‘वन-वे’ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:02+5:302021-03-05T04:23:02+5:30

कोल्हापूर : शहरात वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र होणाऱ्या वाहतूक कोंडीवरुन दिसते. वाहतुकीला नियंत्रित करण्याचे भान विसरलेले पोलीस चौकातील ...

(Planning subject) Named 'One-Way' in Kolhapur city | (नियोजन विषय) कोल्हापूर शहरातील ‘वन-वे’ नावालाच

(नियोजन विषय) कोल्हापूर शहरातील ‘वन-वे’ नावालाच

Next

कोल्हापूर : शहरात वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र होणाऱ्या वाहतूक कोंडीवरुन दिसते. वाहतुकीला नियंत्रित करण्याचे भान विसरलेले पोलीस चौकातील कोपऱ्यात मोबाईलवर मश्गुल असतात. त्यामुळे पोलीस समोर असला, तरीही नियमांचे उल्लंघन करुन सुसाट वाहने पळविण्याचे धाडस वाहनधारकांमध्ये वाढत आहे. बहुतांशवेळा पोलिसांची ड्युटी एकदिशा (वन-वे) मार्गावर कागदोपत्रीच दिसते, प्रत्यक्षात मार्गावर पोलीसच गायब असल्याने वाहतूक अलबेलचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वन-वे नावापुरतेच राहिले आहेत.

शहरातील सुमारे २६ प्रमुख मार्ग हे वाहतुकीसाठी एकदिशा मार्ग म्हणून निश्चित केले आहेत. महाद्वार रोड, शिवाजी रोड, मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी ते लुगडी ओळ हे यातील प्रमुख मार्ग होत. या एकदिशा मार्गांवर दररोज १६ पोलिसांची नेमणूक असते. प्रत्यक्षात या मार्गांवर पोलीस दिसत नाहीत. त्यामुळे हे एकदिशा मार्ग वाहतुकीसाठी दोन्हीही बाजूंनी वापरले जातात.

वाहतूक नियमांचा खो

बिंदू चौकात पार्किंगकडे जाताना वाहनांना उलट्या दिशेने प्रवास करावा लागतो, त्यामुळे बिंदू चौकात वाहतूक कोंडी होते. टिबल सीट, रस्त्यावरील पट्ट्यावरच पार्किंग, एकदिशा मार्गावर उजव्या बाजूला व्यावसायिकांच्या वाहनांचे पार्किंग, काही थांब्यातील रिक्षा रस्त्यावरच उभ्या, सिग्नलला थांबताना चौकात पट्ट्यावरच वाहने उभी करणे, सिग्नलनजीक डाव्या बाजूलाही वाहने थांबविणे हे चित्र संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहे.

रस्त्यावरच होते पार्किंग

शिवाजी मार्गावर सम-विषय तारखेप्रमाणे पार्किंग असले, तरीही चारचाकी वाहने बेशिस्तपणे रस्त्यातच उभी केली जातात. अंबाबाई मंदिराकडे भाविकांची चारचाकी वाहने भवानी मंडपपर्यंत येतात, तेथून बिंदू चौकाकडे वळताना वाहने रस्त्याकडेला बेशिस्तपणे पार्किंग केली जातात. त्यामुळे एकदिशा मार्गांवर पोलिसांची फिरती असावी.

वाहतूक पोलीस गायब

शिवाजी रोड, महाद्वार रोड व मिरजकर तिकटी या प्रमुख तीन एकदिशा मार्गांसह बहुतांशी मार्गांवर कागदोपत्री वाहतूक नियंत्रक पोलीस नेमणुकीवर असला, तरी तो मार्गावर क्वचितच दिसतो. वाहतूक नियमांची वाहनधारकांकडून पायमल्लीच सुरु असते. एकदिशा मार्गावर पोलीस नसल्याचा अंदाज घेत उलट्या मार्गाने वाहने नेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

वन-वे मार्गावर वर्षभरात १७ हजार कारवाई

शहरात २०२० या वर्षभरात केवळ एकदिशा मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १७,०९६ इतक्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामधून ३४,१९२ रुपये दंड वसूल करण्यात आला. शिवाय २०१९मध्ये ११,७८१ वाहनांवर कारवाई करत २३,५६२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

शहरातील स्थिती..

- एकदिशा मार्ग : २६

- एकदिशा मार्गांवर पोलीस नेमणूक : १६

- शहरात सिग्नल चौक : ३४

कोट...

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे, अनेक ठिकाणी पोलीस समुदेशन करतात, प्रबोधनात्मक फलक उभारले आहेत. यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, कोल्हापूर शहर

फोटो नं. ०४०३२०२१-कोल-महाद्वार रोड (पापाची तिकटी)

फोटो नं. ०४०३२०२१-कोल-मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर रोड

फोटो नं. ०४०३२०२१-कोल-शिवाजी रोड

Web Title: (Planning subject) Named 'One-Way' in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.