आराखडा कागदात... सांडपाण्याचा लोट पंचगंगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST2021-01-23T04:23:58+5:302021-01-23T04:23:58+5:30
लढा प्रदूषणमुक्तीचा-०३ विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याचा इचलकरंजी नगरपालिकेने तयार केलेला आराखडा कागदावर तरी ...

आराखडा कागदात... सांडपाण्याचा लोट पंचगंगेत
लढा प्रदूषणमुक्तीचा-०३
विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याचा इचलकरंजी नगरपालिकेने तयार केलेला आराखडा कागदावर तरी भक्कम आहे; परंतु त्यातील उपाययोजना मात्र फारशा प्रत्यक्षात न आल्याने शहरातील घरगुती व औद्योगिक सांडपाण्याचे लोट आजही पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगरपालिका या प्रदूषणाबद्दल फारशी गंभीर नसल्याचाच अनुभव आहे. सध्या प्रतिदिन ४० दशलक्ष लिटर घरगुती व औद्योगिक सांडपाणी तयार होते. त्यातील फक्त आठ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होते; परंतु प्रक्रिया केलेले व न केलेलेही मैलामिश्रित पाणी आजही पंचगंगा नदीत मिसळत आहे.
इचलकरंजी शहराला १८ किलोमीटर लांब असलेल्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीमधून पाणी योजना राबविण्यात आली आहे. सध्या प्रतिदिन ४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यातून प्रतिदिन ४० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते; परंतु त्यातील औद्योगिक व घरगुती किती आहे याचे काटेकोर मोजमाप नगरपालिकेकडे नाही. नगरपालिका ती करण्याच्या फंदातही पडलेली नाही. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी म्हणे १९९५ ला नगरपरिषदेने भुयारी गटार योजना राबवली. त्यातून भुयारी गटार योजनेचे जाळे, मैला उत्प्रेक्षागृह, मलशुद्धीकरण केंद्र यांची उभारणी करण्यात आली. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून २००१ ला नगरपालिकेकडे हस्तांतरित झाली. निम्म्या शहरातील म्हणजे २० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते, असा नगरपालिकेचा दावा आहे. गंमत म्हणजे हे प्रक्रिया केलेले सांडपाणी केंद्राशेजारील शेतीसाठी म्हणे वापरण्यात येते. उर्वरित सांडपाणी काळ्या नाल्यामध्ये जाते. प्रक्रियायुक्त सांडपाण्याची गुणवत्ता नदी अथवा नाल्यामध्ये विसर्ग करण्यायोग्य असल्याचेही नगरपालिकेचे म्हणणे आहे. नगरपालिकेने कागदावर दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी टाकवडे वेस येथील या प्रक्रिया केंद्राला भेट दिली. हे केंद्र अक्षरक्ष: गंजलेल्या स्थितीत बंदच आहे. भुयारी गटार योजनेस सांडपाणी मैला उत्प्रेक्षागृहामध्ये दोन ट्रंकमेनद्वारे व दोन रिसिव्हिंग चेंबरमधून (मेन इंटकवेल) मुख्य ग्राहक विहिरीमध्ये जमा करून त्यातून वेटवेलमध्ये सांडपाणी एकत्र करून सदरचे पाणी अनुक्रमे २०० अश्वशक्तीच्या पंपाद्वारे २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राकडे पाठविले जाते, असे नगरपालिका सांगते; परंतु हे सारे खोटे आहे. कारण हा २०० अश्वशक्तीचा पंपच वर्षातून आठ-दहा महिने बंद असतो. प्रस्तुत प्रतिनिधींने भेट दिली तेव्हाही तो बंदच होता. पंप बंद राहिल्यावर हे मैलामिश्रित पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे उचलता येत नाही म्हणून नगरपालिकेने त्या केंद्राशेजारी हजार लिटरची टाकी ठेवली आहे. त्यामध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे मिश्रण तयार केले जाते व हे मिश्रण अर्धा इंची पाईपमधून थेट ओढ्यात सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ओढ्यात सोडलेल्या पाण्यावर प्रक्रिया होईल असे नगरपालिकेला वाटते. त्याच्याशेजारीच माती पोत्यात भरून बंधारा घातला आहे. परंतु त्याला जोडलेल्या दोन मोठ्या नळ्यांतून अत्यंत विषारी पाणी काळ्या ओढ्यातूनच नदीकडे वाहत होते हे पाहायला मिळाले..
नळ्यांना तोट्याच नाहीत..
इचलकरंजी शहराची लोकसंख्या तीन लाख आहे. पाण्याची दैनंदिन गरज ५४ दशलक्ष घनमीटर आहे. शहरातील नागरिकांच्या नळ्यांना तोट्याच नाहीत. त्यामुळे पाणी गटारीतून वाहून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सांडपाणी रोखणे शक्य नाही, असे स्वत: नगरपालिकाच म्हणते. पाण्याच्या नळांना तोट्या बसविण्यासाठीची तसदीही जी नगरपालिका घेत नाही, ती नदीचे प्रदूषण रोखण्यात काय पुढाकार घेईल, याचा नुसता विचारच केलेला बरा...!
पाणी मीटर नाहीत
शहरातील नागरिकांना मीटर लावून पाणीपुरवठा होत नाही. आता नगरपालिका म्हणते की नळ जोडण्यांना जलमापक बसविणे गरजेचे आहे. गरजेचे असेल तर मग तसा आदेश काढून त्याबद्दल सक्ती करून त्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी नगरपालिकेचीच आहे. ही मीटर बसविण्यासाठी काही राज्याचे मुख्यमंत्री येणार नाहीत.
इच्छाशक्तीचा अभाव
नगरपालिका असे म्हणते की, जलमापकानुसार बिल आकारणी केल्यास पाणी वापर कमी होईल आणि सांडपाणी ४० टक्क्यापर्यंत कमी होईल. ज्या छोट्या गोष्टी करणे नगरपालिकेला शक्य आहे, त्या ती करीत नाही आणि मोठ्या उपाययोजना अमलात आणण्याची त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही. मीटर बसवली तर लोकांना काय वाटेल असा विचार राजकीय हेतूने केला जातो.
२२०१२०२१-कोल-इचलकरंजी प्रदूषण०३
इचलकरंजी नगरपालिकेने टाकवडे वेस येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी पंपिंग सेंटर उभारले आहे; परंतु या सेंटरमधील वीज पंप सध्या बंदच आहे. त्यामुळे मैलामिश्रित पाणी थेट काळ्या ओढ्यात सोडले जाते. त्यावर प्रक्रिया केली असे सांगण्यासाठी ओढ्याच्या काठावर अशी पाण्याची टाकी ठेवून त्यामध्ये प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर मिसळली जाते व ते पाणी असे पाईपने ओढ्यात सोडले जाते. ओढ्यानेच या पाण्यावर प्रक्रिया करावी, असा हा सगळा अजब कारभार आहे. (छाया : उत्तम पाटील)
२२०१२०२१-कोल-इचलकरंजी प्रदूषण ०१ व ०२
इचलकरंजी नगरपालिकेने टाकवडे वेस येथे उभारलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या पंपिंग सेंटरची ही आजची स्थिती आहे. (छाया : उत्तम पाटील)