कणगला, आडी येथे जागेची पाहणी
By Admin | Updated: August 8, 2014 00:36 IST2014-08-08T00:19:02+5:302014-08-08T00:36:20+5:30
उद्योजकांना लागले कर्नाटकचे वेध : ‘गोशिमा’चे शिष्टमंडळ जागेबाबत समाधानी

कणगला, आडी येथे जागेची पाहणी
कणेरी : पायाभूत सुविधांची कमतरता, वीज आणि पाणी बिलांतील वाढ यामुळे वैतागलेले उद्योजक कर्नाटकात स्थलांतरित होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. भूसंपादनाबाबत आज, गुरुवारी कणगला, आडी मल्लया (कर्नाकट) येथील ८५० एकर जागेची गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड झोनल आॅफिसचे प्रमुख अधिकारी रमेश वाय गुड्डारेडी यांच्या निमंत्रणावरून ‘गोशिमा’चे गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे चेअरमन उदय दुधाणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कणगला, आडी मल्लया (कर्नाकट) येथील ८५० एकर जागेचे ‘केआयडीबी’च्या (कर्नाटक राज्य) अधिकाऱ्यांसमवेत भूसंपादनबाबत संयुक्त जागेची पाहणी केली. ही जागा उद्योग उभारणीस अनुकूल असून, शिष्टमंडळाने जागेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
‘केआयडीबी’चे अधिकारी ज्यांनी आज, गुरुवारी गोकुळ शिरगाव येथे ‘गोशिमा’ कार्यालयास भेट देऊन आडी मल्लया, कणगला येथील दोन्ही जागेबद्दल सविस्तर माहिती देऊन उपस्थित उद्योजकांच्या शंकेंचे निरसन केले.
गुड्डारेडी म्हणाले, प्रस्तावित औद्योगिक वसाहतीस हिरण्यकेशी नदीमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांमध्ये कर्नाटक राज्यांमधील होणाऱ्या वीज प्रकल्पामुळे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीस वीजपुरवठा चांगला मिळणार आहे. नवीन उद्योग उभारणीसाठी कर सुविधा मिळणार आहेत. लवकरात लवकर जागा ताब्यात देण्याचे संकेत त्यांनी दिले.
‘गोशिमा’चे अध्यक्ष दुधाणे, उपाध्यक्ष संजय उमरनट्टी, संग्राम पाटील, जे. आर. मोटवाणी, आर. पी. पाटील, लक्ष्मीदास पटेल, भालचंद्र कुलकर्णी, राहुल बुधले, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगले (मॅक) चे संचालक एस. बी. कुलकर्णी, गोरख माळी, यांच्यासह अनेक उद्योजक यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)