२५ टक्के वाहनांनी भरला दुप्पट टोल, कोगनोळी टोल नाक्यावरील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:55 IST2021-02-16T18:52:26+5:302021-02-16T18:55:27+5:30
Fastag Toll Kolhapur- केंद्र सरकारने अनेक वेळा मुदतवाढ देऊन शेवटी मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत ७५ टक्के वाहनांनी फास्टॅग काढून घेतले असले तरी अद्याप २५ टक्के वाहने फास्टॅगविनाच प्रवास करतात. त्यांच्याकडून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्याने दुप्पट टोल वसूल करण्यात आला.

फास्टॅगमुळे वेळेची बचत होत असल्याने टोल नाक्यावरील गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. छाया : बाबासो हळिज्वाळे
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : केंद्र सरकारने अनेक वेळा मुदतवाढ देऊन शेवटी मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत ७५ टक्के वाहनांनी फास्टॅग काढून घेतले असले तरी अद्याप २५ टक्के वाहने फास्टॅगविनाच प्रवास करतात. त्यांच्याकडून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्याने दुप्पट टोल वसूल करण्यात आला.
कोगनोळी टोल नाक्यावरून सरासरी बारा ते सोळा हजार वाहने रोज प्रवास करतात यापैकी ७५ टक्के वाहनेच फास्टॅग काढून घेऊन त्याद्वारे टोल भरतात. इतर २५ % वाहनांकडे फास्टॅग नसल्याने त्यांना दुप्पट टोल भरावा लागला. या टोल नाक्यावर गेल्या अनेक दिवसांपासून फास्टॅग सक्ती विषयी ध्वनिक्षेपकावरून प्रबोधन करण्यात येत होते.
दोन दिवसात पाचशे ते आठशे फास्टॅगची विक्री
कोगनोळी टोल नाका परिसरात आयसीआयसीआय बँक पेटीएम पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक यांच्या वतीने फास्टॅगची विक्री करण्यात येत आहे. सोळा तारखेपासून फास्टॅग बंधनकारक होत असल्याने या ठिकाणावरून दोन दिवसात पाचशे ते आठशे फास्टॅगची विक्रमी विक्री झाली.
एका मिनिटात दहा गाड्यांचा टोल वसूल
रोखीने टोल भरताना एका गाडीला चार ते पाच मिनिटे वेळ लागतो परंतु फास्टॅगमुळे आपोआप टोलची रक्कम कपात होत असल्याने एका गाडीला पाच ते सहा सेकंद लागतात त्यामुळे एका मिनिटात दहा गाड्यांचा टोल वसूल होतो.
फास्टॅग असून दुप्पट टोल
काही वाहनधारकांनी फास्टॅग घेतले होते परंतु त्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसल्याने त्यांना दुप्पट टोल भरावा लागत होता. अशा वाहनधारकांना टोल वरील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून रिचार्ज केल्यानंतर एक वेळ टोल घेऊन पुढे सोडले.