कोल्हापूर : रिल्स बनविण्याच्या स्पर्धेतून इचलकरंजीतील फोटोग्राफरने कोल्हापुरातील सराईत गुन्हेगाराला २० हजार रुपयांची सुपारी देऊन स्पर्धक फोटोग्राफरवर दरोडा घालायला लावला. गुरुवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास रंकाळा परिसरातील इराणी खणीजवळ मॉडेलिंग फोटोग्राफीसाठी बोलावून सात जणांनी चाकूचा धाक दाखवत फोटोग्राफर सुरज विजय गोडसे (वय २३, रा. महालक्ष्मीनगर, शाहूवाडी) याच्याकडील कॅमेरा लंपास केला. जुना राजवाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासात दरोड्याचा उलगडा करून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा कॅमेरा हस्तगत केला.सुपारी घेणारा सराईत गुन्हेगार यश खंडू माने (१९, रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ, कोल्हापूर), सुपारी देणारा फोटोग्राफर राहुल बाबासो कोरवी (२३, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याच्यासह महम्मदकैफ अल्लाउद्दीन हैदर (१९, रा. वारे वसाहत), सिद्धेश संतोष पांडव (१९, रा. सुभाषनगर, कोल्हापूर), पृथ्वीराज संजय कदम (२०) आणि रोहित रतन बिरजे (२३, दोघे रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींची सोमवारपर्यंत (दि. ५) पोलिस कोठडीत रवानगी झाली, तर अल्पवयीन मुलाला बालनिरीक्षणगृहात पाठवण्यात आले.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज गोडसे याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. रंकाळ्याजवळ त्याचा स्टुडिओ असून, रिल्स, मॉडेलिंग, वेडिंग फोटोग्राफीसाठी त्याच्याकडे अत्याधुनिक कॅमेरे आणि सामग्री आहे. रिल्स बनविण्यासाठी अनेक ग्राहक त्याच्याकडे जात असल्याच्या रागातून इचलकरंजीतील फोटोग्राफर राहुल कोरवी याने त्याचा व्यवसाय बंद पाडण्याचा कट रचला.
त्याच्याकडील कॅमेरे पळविण्यासाठी वारे वसाहतीमधील सराईत गुन्हेगार यश माने याला २० हजारांची सुपारी दिली. माने याने साथीदारांच्या मदतीने गुरुवारी सकाळी गोडसे याला फोन केला. मॉडेलिंग फोटोग्राफीसाठी दुपारी तीनच्या सुमारास इराणी खणीजवळ बोलावून घेतले. तिथे पोहोचताच गोडसे आणि त्याचा कर्मचारी आतिश हाटकर या दोघांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने कॅमेरा, लेन्स, वायरलेस माइक काढून घेतले.२४ तासांत आरोपींना अटकगोडसे याने फिर्याद देताच पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला. फोटोग्राफीसाठी फोन केलेल्या तरुणांना बोलावून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी यश माने याच्या सांगण्यावरून गोडसे याला फोन केल्याचे सांगितले. त्यानंतर माने याच्यासह त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहित बिरजे याच्या घरातून दरोड्यातील कॅमेरा, लेन्स आणि वायरलेस माइक हस्तगत केले. यातील माने याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच सुपारी देणारा कोरवी याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.सहा हजार ॲडव्हान्स घेतलेकॅमेरा काढून घेण्यासाठी २० हजार रुपयांची सुपारी ठरली होती. त्यापैकी सहा हजारांचा ॲडव्हान्स माने याने ऑनलाइन स्वीकारला होता. कॅमेरा मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम कोरवी देणार होता. तत्पूर्वीच या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले.
Web Summary : An Ichalkaranji photographer hired criminals to rob a rival in Kolhapur over Reels competition. Police arrested six, recovering stolen camera equipment worth ₹4.5L within 24 hours.
Web Summary : रील्स प्रतियोगिता को लेकर इचलकरंजी के एक फोटोग्राफर ने कोल्हापुर में एक प्रतिद्वंद्वी को लूटने के लिए अपराधियों को काम पर रखा। पुलिस ने 24 घंटे के भीतर 4.5 लाख रुपये के चोरी हुए कैमरे के उपकरण बरामद कर छह लोगों को गिरफ्तार किया।