‘१०० कोटींचा हाच तो विकास’; खड्यातील पाण्यात कोल्हापूर महापालिकेचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी काढले वाभाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:56 IST2025-10-25T18:56:24+5:302025-10-25T18:56:41+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील रस्ते अन् खड्ड्यांचा विषय प्रचंड गाजत आहे

‘१०० कोटींचा हाच तो विकास’; खड्यातील पाण्यात कोल्हापूर महापालिकेचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी काढले वाभाडे
कोल्हापूर : कोल्हापूरची कोणतीही गोष्ट ही पुरेपूरच असते. त्यामुळे पुरेपूर कोल्हापूर हा नारा देशभर घुमला. आता कोल्हापूर शहरातील खड्ड्यांनी ही पुरेपूर कोल्हापूरची ओळख अधिक दृढ केली नाही तर नवलच. कोल्हापूर महानगरपालिकेच्या समाेरच एक भला मोठा खड्डा पडून त्यातील पाण्यात महानगरपालिकेच्या इमारतीचे प्रतिबिंब उमटले.
हा फोटो नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर करत नाद करती काय, जगातील सर्वात सुंदर फोटो असे कॅप्शन दिले आहे. या सर्वात सुंदर फोटोचे लोकेशन कुठे आहे, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. खड्ड्यांनी भरलेल्या शहरात चक्क महापालिका कार्यालयाच्या समोरच्या खड्ड्यातच महापालिका दिसत असल्याने अनेकांनी हा तर कोल्हापूरचा लाल किल्ला म्हणून महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. कोल्हापूरच्या रस्त्यांना शोभेले असे छायाचित्र म्हणत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. ‘खड्ड्यात कोल्हापूर, कोल्हापुरात खड्डा’, ‘१०० कोटी रुपयांचा हाच तो विकास, महानगरपालिका गेली खड्ड्यात’ अशा प्रतिक्रियांचा या फोटोवर अक्षरश: पाऊस पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील रस्ते अन् खड्ड्यांचा विषय प्रचंड गाजत आहे. ऐतिहासिक कोल्हापुरातील हे खड्डे पाहून आम्ही कोल्हापूरकर आहोत हे सांगायलाही कसंतरी वाटतंय या शब्दांत अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. सध्या सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफाॅर्मवर हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून, महानगरपालिकेच्या दारातील रस्तेही प्रशासनाला व्यवस्थित करता येत नसतील तर ते शहरातील इतर रस्त्यांच्या सुधारणेबाबत अपेक्षाच करायला नको या शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.