अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ स्थायी सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:16 IST2020-01-16T13:15:35+5:302020-01-16T13:16:38+5:30
कोल्हापूर शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. जर सुरळीत पाणीपुरवठा होणार नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू का, असा संतप्त सवाल पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सदस्यांनी विचारला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.

अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ स्थायी सभा तहकूब
कोल्हापूर : शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. जर सुरळीत पाणीपुरवठा होणार नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू का, असा संतप्त सवाल पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सदस्यांनी विचारला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.
राजारामपुरी प्रभागात १५ दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. शाहूपुरीत पाच दिवस पाणी नाही. उपसा वारंवार बंद पडत आहे. फोन केला, तर कारणे सांगितली जातात. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे का? अशा शब्दांत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
लेव्हलसाठी पाणी वारंवार पत्रव्यवहार करूनही सोडले जात नसेल, तर पाटबंधारे विभागाची सोमवारी वेळ घ्या. त्यांच्या कार्यालयात जाऊन बसू, असा इशारा संदीप कवाळे, संजय मोहिते, पूजा नाईकनवरे यांनी दिला.
पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झालेली असल्याने त्याचा परिणाम पाणी उपसावर होत आहे. याबाबत पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. पुईखडी येथून कमी दाबाने पाणी येत आहे. शिंगणापूर बंधारा लिकेज दुरुस्तीकरिता आठ-१0 तास लागणार आहेत; यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
शिंगणापूर व आपटेनगर येथील पाणी उपसा करण्यात येणाऱ्या मोटरच्या मुदती संपलेल्या आहेत. त्या बदलण्याचे नियोजन करा, अशी सूचना राजाराम गायकवाड यांनी केली. बजेटमध्ये रक्कम २२ लाखांची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे नवीन पंप बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.