लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: देशभर जात, धर्म आणि पंथावरून द्वेषाचे राजकारण वाढीस लागले असताना, कोल्हापुरात मात्र प्रेम आणि बंधुता दिसत आहे. एकतेची गंगा-जमुना संस्कृतीचा विसर पडलेल्या काळात आजच्या घडीला हे खूप मौल्यवान आहे, ते तुम्ही असेच जपून ठेवा, असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध कवी, उर्दू शायर व वक्ते इम्रान प्रतापगढी यांनी रविवारी येथे केले.
नगरसेवक भूपाल शेटे यांच्या निधीतून जवाहरनगर येथील सिरत मोहल्ला सांस्कृतिक सभागृह, एम एम ग्रुप व्यायामशाळा सभागृह, दत्त तालीम मंडळ, भूमिगत पाण्याची टाकी या विकास कामांचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते व उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध कवी, उर्दू शायर व वक्ते इम्रान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत झाले. आमदार चंद्रकांत जाधव, तौफिक मुलाणी, भूपाल शेटे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
शेरोशायरी आणि कवितांच्या दमदार सादरीकरणातून प्रतापगढी यांनी कोल्हापूरकरांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, गंगा-यमुना ही खरी देशाची संस्कृती आहे. पण केंद्रात सत्तेवर बसलेले हे सगळे वातावरण बिघडवत आहेत. सुदैवाने आज राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, म्हणून येथील परिस्थिती उत्तर प्रदेशसारखी झालेली नाही. विशेषतः कोल्हापुरात तर कधीही द्वेषाला थारा मिळालेला नाही. त्यामुळेच देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही कोल्हापूरकरांनी महापालिकेत काँग्रेस आघाडीला सत्तेवर बसवले. येथून पुढे देखील असेच काँग्रेसच्या मागे ठामपणे उभे राहा.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी, कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणायचीच आहे असे सांगून, जवाहरनगर प्रभाग ओबीसी झाला आहे. सर्व मुस्लिम समाजाने एकत्र बसावे, एक उमेदवार निश्चित करावा, पुढचे मी बघतो, अशी ग्वाही दिली.
चौकट
कोल्हापुरात आल्यानंतर येथील वातावरण पाहून मनाला खूप समाधान वाटले. हिंदू-मुस्लिम द्वेषाचे वारे येथे कधी फिरकू नये. राजकारण होते, निवडणुका येतात-जातात, पण माणूस आणि त्याचे मन शेवटपर्यंत राहते, हे कायम लक्षात असूद्या, असेही प्रतापगढी यांनी कवितेतून सुनावले.
चौकट
मुस्लिम समाजाने मुला-मुलींना चांगले शिक्षण द्यावे. आज स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे पडता कामा नयेत, मुलांना चांगले धडे देण्यासाठी मला केव्हाही बोलवा, मी हजर असेन, अशी ग्वाही प्रतापगढी यांनी दिली.
चौकट
सतेज पाटील यांचे नाव दिल्लीत खूप ऐकले आहे. येथे आल्यावर, त्यांच्यावर लोक का प्रेम करतात ते दिसले. द्वेषावर मतांचे पीक तर बरेच जण घेतात, पण लोकांच्या मनावर राज्य करणारे सतेज पाटील एकमेव असतात, अशा शब्दात प्रतापगढी यांनी कौतुक केले.